रोहित शर्मा हा मांसपेशींच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सकडून दोन सामन्यात खेळू शकलेला नाही. तो खेळेल अशी आशा जरी व्यक्त केली जात असली तरी नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी उपस्थित केला आहे.
हर्षा भोगले यांनी ट्विट केले की, रोहित शर्मा याचा समावेश कसोटी क्रिकेट संघात करण्यात आलेला नाही. हा संघ डिसेंबरमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे तो यापुढे आयपीएल खेळू शकणार नाही, हे स्पष्ट होते. त्याच्या दुखापतीकडे लक्ष दिले जात आहे. मात्र क्वारंटाईन आणि प्रवास करण्याच्या नियमांमुळेही त्याला लांब रहावे लागत असेल.असे असले तरी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या तंदुरुस्तीच्या बाबतीत महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. रोहित याचा सराव करतानाचा फोटो मुंबई इंडियन्सने पोस्ट केला आहे.
भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी रोहितच्या दुखापतीविषयी शंका व्यक्त केली आहे. ‘जर रोहितची दुखापत खरंच गंभीर असती, तर त्याने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला नसता,’ असे गावसकर म्हणाले. त्यांनी एका क्रीडा वाहिनीला सांगितले की, ‘चाहत्यांना हे जाणून घ्यायचा अधिकार आहे की, रोहितचा समावेश टीम इंडियामध्ये का नाही? बीसीसीआयने यामागचे कारण स्पष्ट करायला हवे. त्याला नेमके कोणत्या कारणामुळे संघाबाहेर ठेवण्यात आले हे कळालेच पाहिजे. रोहितच्या दुखापतीबाबत पूर्ण माहिती दिली पाहिजे.’ गावसकर पुढे म्हणाले की, ‘माझ्या मते फ्रेंचाईजी रोहितला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू इच्छित नाही. त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे. प्रतिस्पर्धी संघाला यामुळे मानसिक फायदा होईल, अशी त्यांची अजिबात इच्छा नाही. पण आपण सध्या भारतीय संघाविषयी चर्चा करत आहोत.’