मुंबई - विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) आपल्या गमतीशीर पण रोखठोक, हजरजबाबी कॉमेंटसाठी प्रसिध्द आहे. त्याने आता किंग्ज इलेव्हनच्या (KXIP) एका अष्टपैलू खेळाडूवर लक्ष्य साधले आहे. 'विरु' ने या खेळाडूबद्दल म्हटलेय की, फ्रँचाईजीज या खेळाडूला संघात घेतात तरी कशा, हेच कळत नाही. किंग्ज इलेव्हनचा हा खेळाडू यंदा सपशेल अपयशी ठरत आहे. या आॕस्ट्रेलियन खेळाडूने आयपीएल 2020 (IPL2020) मध्ये आतापर्यंत सहा सामन्यात फक्त 48 धावा केल्या आहेत आणि सरासरी फक्त 12 धावांची आहे.
एवढा अपयशी ठरुनही किंग्ज इलेव्हन वारंवार या खेळाडूला संधी देतेय आणि टी-20 चा बादशहा असलेला युनिव्हर्सल किंग हा मात्र बाहेरच आहे. आणि अपयशी ठरत असले तरी किंग्जचे व्यवस्थापन त्याचा विचार करायला तयार नाही हे मोठे कोडेच आहे. किंग्ज इलेव्हनने गेल्या चार सामन्यांसह एकूण पाच सामने गमावले आहेत.
विरु'ने टीकेचे लक्ष्य केलेला हा खेळाडू म्हणजे ग्लेन मॕक्सवेल! (Glen Maxwell) विरुने म्हटलेय की कळत नाही, मॕक्सवेलला आणखी कशाप्रकारे संधी मिळायला हवी. सनरायजर्स (SRH)विरुध्द पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यावर तो लवकरच फलंदाजीला आला. आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी त्याच्याकडे भरपूर ओव्हर्स होती आणि त्याच्यावर डेथ ओव्हर्ससारखे दडपणही नव्हते. तरी तो फक्त 7 धावा काढून (त्यासुध्दा 12 चेंडूत) बाद झाला.
दरवर्षी त्याचा परफॉर्मन्स असाच असतो. त्यामुळे खेळताना त्याची काय मानसिकता असते हेच कळत नाही. पण दरवर्षी लिलावांमध्ये फ्रँचाईजी त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजत असतात.का...कळत नाही! मला वाटतं पुढच्या वेळी लिलावात त्याची किंमत 10 करोडवरुन 1-2करोडवर आलेली असेल आणि खरे म्हणजे त्याची लायकी तेवढ्याच रकमेची आहे. 2016 पासून त्याने अर्धशतकसुध्दा केलेले नाही.
आयपीएल 2020 मध्ये त्याने 1, 5, 13, 11, 11, नाबाद 11 आणि 7 धावांच्या खेळी केल्या आहेत. यादरम्यान त्याने एकही षटकार लगावलेला नाही. इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन यानेसुध्दा मॕक्सवेलला डच्चू देण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. तर फिरकीपटू प्रज्ञान ओझाने त्याच्याजागी गेलला संधी द्यायला हवी असे मत व्यक्त केले आहे.