दुबई: आयपीएल २०२० मध्ये (IPL 2020) अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांशिवाय सामने खेळवले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाही. त्यामुळे सामना सुरू असताना अतिशय मोजक्या व्यक्ती पाहायला मिळतात. खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही यंदा आयपीएलपासून राहावं लागत आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी (Sakshi Dhoni) चेन्नईच्या प्रत्येक सामन्याला उपस्थित असायची. पण यंदा कोरोनामुळे तिलाही स्टेडियमवर जाऊन सामना पाहणं शक्य नाही.आयपीएलचे सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर जाता येत नसल्यानं धोनीची खूप आठवण येत असल्याची भावना साक्षीनं व्यक्त केली. धोनीची खूप आठवण येते. पण स्टेडियमवर जाणं मिस करत नसल्याचं ती पुढे म्हणाली. 'मी टीव्हीवर आयपीएल सामने पाहते. त्यामुळे स्टेडियमवर जाऊन सामना पाहण्याची फारशी आठवण येत नाही. पण धोनीपासून दोन महिने दूर राहणं माझ्यासाठी आणि झिवासाठी अवघड आहे,' असं साक्षीनं सांगितलं.
धोनीची मनोरंजन क्षेत्रात एन्ट्रीजगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक असलेला MS Dhoni आता मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. धोनीनं 2019मध्ये स्वतःचा Dhoni Entertainment बॅनर लाँच केला होता आणि त्याखाली त्यानं 'Roar of the Lion' ही पहिली डॉक्युमेंट्री तयार केली होती. आगामी वर्षात तो आणखी अशा डॉक्युमेंट्रींना प्रोड्युस करताना दिसणार आहे.
धोनीची पत्नी साक्षी ही या प्रोडक्शन हाऊसची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. ती म्हणाली,''नवीन लेखकांच्या प्रसिद्ध न झालेल्या पुस्तकांचे हक्क आम्ही घेतले आहेत. त्यांचे आम्ही वेब-सीरिजमध्ये रुपांतर करणार आहोत. या पौराणिक कथा असणार आहेत.'' त्यांचे दिग्दर्शन कोण करेल, याची निवड लवकरच केली जाईल. क्रिकेट हे धोनीचं पहिलं प्रेम आहे, परंतु धोनी आणि साक्षी आता प्रोडक्शन हाऊसमध्ये काम पाहणार आहेत. ''जेव्हा आम्ही Roar of the Lion डॉक्युमेंट्रीवर काम करत होतो, तेव्हाच मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकण्याची हीच योग्य वेळ असल्याचा आम्ही विचार केला. आम्ही नव्या, उदयोन्मुख चेहऱ्यांना संधी देण्याचे ध्येय ठेवले आहे आणि तेही ओरिजिनल कंटेन्टसोबत. माही प्रोडक्शन हाऊसमध्ये पूर्णवेळ लक्ष देणार नाही. लोकांना क्वालिटी कंटेन्ट मिळेल, याची आम्ही काळजी घेणार आहोत. माही आणि माझा निर्णय अंतिम असेल. लोकांना मनाला भिडतील अशा कथा आम्हाला सादर करायच्या आहेत,''असेही साक्षीनं सांगितलं.