मुंबई - किंग्ज ईलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) या संघांमधील होणाºया आजच्या Indian Premier League (IPL 2020) सामन्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. याचे कारण म्हणजे, दोन्ही संघांमध्ये असलेल्या आक्रमक फलंदाजांची भरणा. यामुळेच आज चौकार-षटकारांची आतषबाजी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचवेळी, या सामन्यात दबाव असेल ते दोन्ही संघांच्या गोलंदाजांवर. त्यादृष्टीने गोलंदाजांनी योजनाही आखल्या आहेत. मात्र राजस्थानसाठी सर्वात मोठा अडसर ठरणार आहे तो जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलचा (Lokesh Rahul). राजस्थानने राहुलला स्वस्तात बाद केले, तर ते अर्धी लढाई तिथेच जिंकतील. का ते आपण पाहूया...
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात तडाखेबंद शतक झळकावून राहुलने यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या शतकी खेळीची नोंद केली. त्याचबरोबर त्याने तीन विक्रमांनाही गवसणी घातली. आयपीएलमध्ये २००० धावांचा पल्ला कमी डावांमध्ये पार करत त्याने वेगवान भारतीय फलंदाज म्हणून विक्रम रचला. हा विक्रम करताना त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. त्याचप्रमाणे नाबाद १३२ धावांची खेळी करताना राहुलने भारतीय फलंदाज म्हणून सर्वोत्तम खेळी केली, तसेच त्याची खेळी कोणत्याही कर्णधाराने नोंदवलेली सर्वोच्च खेळीही ठरली.
आता राजस्थानला दबाव आला असेल, ते राहुलला गोलंदाजी करण्याचे. जरी राजस्थानने चेन्नई सुपरकिंग्जला १० धावांनी नमवले असले, तरी राहुलचा राजस्थानविरुद्ध असलेला रेकॉर्ड पाहता त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे मोठे आव्हान ठरेल. २०१८ सालापासून आयपीएलमध्ये राहुलने कमालीचे सातत्य राखताना सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. २०१८ पासून राहुलने आतापर्यंत सर्वाधिक १४०५ धावा काढल्या असून यानंतर रिषभ पंत (१२४०), शिखर धवन (१०५३), विराट कोहली (१००९) आणि शेन वॉटसन (१००४) यांचा क्रमांक आहे. याशिवाय २०१८ आणि २०१९ या दोन्ही सत्रांमध्ये राहुलने ५० हून अधिकच्या सरासरीने फटकेबाजी केली आहे. २०१८ पासून ५० हून अधिक सरासरी राखणारा राहुल एकमेव फलंदाज आहे.|
राजस्थानविरुद्धही राहुलने सातत्याने धावा फटकावल्या आहेत. आतापर्यंत राहुलने राजस्थानविरुद्ध ५५च्या सरासरीने एकूण २७५ धावा फटकावल्या आहेत. राजस्थानविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारा राहुल तिसरा फलंदाज असून त्याच्यापुढे शॉन मार्श आणि मायकल हसी आहेत. या दोघांनी राजस्थानविरुद्ध अनक्रमे ४०९ आणि ३५० धावा फटकावल्या आहेत. त्यामुळेच राहुलला लवकर बाद करणे राजस्थानसाठी अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे.
Web Title: IPL 2020: If Rahul is dismissed early, Rajasthan Royals will win half the battle; Know the reason
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.