Join us  

IPL 2020: आयपीएलला प्रायोजक नक्की मिळणार

स्पर्धेच्या प्रायोजकत्वावरही मोठी चर्चा रंगत आहे. पाच वर्षांसाठी मुख्य प्रायोजक म्हणून करार केलेल्या विवोने या वर्षासाठी प्रायोजक म्हणून माघार घेतली आणि यंदाच्या सत्रासाठी नव्या प्रायोजकासाठी शोध सुरू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 2:01 AM

Open in App

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर, लोकमतअखेर भारतीय सरकारकडून अधिकृत परवानगी मिळाली आणि आयपीएलच्या तयारीने आता अधिक जोर पकडला आहे. याआधी यूएईत स्पर्धा आयोजन करण्याचे ठरल्यानंतर सर्व प्रकारच्या तयारीला वेग आला होता. सरकारकडूनही मान्यता मिळेल, असा विश्वास होता, मात्र अधिकृत घोषणा झाली नव्हती. अखेर ही अडचणही आता दूर झाली आहे. आता यूएईमध्ये कशाप्रकारे व्यवस्था करण्यात येईल, संघांचे आगमन कसे होईल, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था कशी असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.स्पर्धेच्या प्रायोजकत्वावरही मोठी चर्चा रंगत आहे. पाच वर्षांसाठी मुख्य प्रायोजक म्हणून करार केलेल्या विवोने या वर्षासाठी प्रायोजक म्हणून माघार घेतली आणि यंदाच्या सत्रासाठी नव्या प्रायोजकासाठी शोध सुरू झाला. दोन्ही देशातील तणाव पाहता माझ्या मते बीसीसीआय आणि विवो यांनी मिळून एकमताने यंदा वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पण पुढील वर्षी, म्हणजे ६-७ महिन्यातच विवोचे पुनरागमन होऊ शकते. दुसरीकडे, यामुळे नव्या आस्थापनांना प्रायोजक म्हणून पुढे येण्याची मोठी संधी मिळाली आहे. परिवारातील सदस्यांना खेळाडूंसह प्रवास करता येणार नाही. असे होत असेल का माहीत नाही, पण खेळाडूंसह परिवारातील सदस्यही प्रवास करतील असे व्हायला नको. कारण काही नियम असतात, त्यांचे पालन व्हायलाच पाहिजे. नियमांचे गंभीरपणे पालन केले पाहिजे. नियम मोडल्याचा सर्वात मोठा फटका नुकताच वेस्ट इंडिजच्या फॅबियन अ‍ॅलेन या क्रिकेटपटूला बसला. जमैका ते त्रिनिदादचे विमान त्याला वेळेत पकडता आले नाही आणि यामुळे त्याला आता संपूर्ण स्पर्धेला मुकावे लागेल. कारण तो क्वारंटाईन कालावधी पूर्ण करु शकणार नाही.क्रिकेटमध्ये मुख्य प्रायोजक म्हणून संधी मिळणे सोपे नसते. माझ्या मते आयपीएलसाठी ४४० कोटी रुपयांचा प्रायोजक कदाचित मिळणार नाही, पण बीसीसीआयला प्रायोजकच मिळणार नाही, असे होणार नाही. किंमत कदाचित कमी होईल, पण प्रायोजक नक्की मिळेल. त्याचप्रमाणे, यूएईमधील नियमांवरही गंभीर लक्ष द्यावे लागेल. आयपीएलमधील सर्व संघ वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करतील. ही एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया आहे. कॅरेबियन लीगमधील सर्व संघ एकाच हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहेत, पण आयपीएलमध्ये तसे नसेल. शिवाय संघातील सदस्यांची संख्याही २४ पर्यंत मर्यादित ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे.

टॅग्स :आयपीएल 2020