नवी दिल्ली/ धर्मशाळा : कोरोना संक्रमणामुळे आयपीएल आयोजनाविषयी बीसीसीआयने अद्याप मौन पाळले असले, तरी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदा आयपीएलचे आयोजन प्रेक्षकांविना करावे लागेल, असे संकेत दिले आहेत. रिकाम्या स्टेडियममध्येच सामने घ्यावेत, असा सरकारचा आग्रह आहे. दुसरीकडे १५ एप्रिलपर्यंत व्हिसा देण्यावर बंदी आणल्यामुळे स्पर्धा झाली तरी सुरुवातीच्या काही सामन्यांत विदेशी खेळाडूंना सहभागी होता येणार नाही.
आयपीएल संचालन परिषदेची बैठक शनिवारी होऊ घातली आहे. बैठकीत लीगचे आयोजन रिकाम्या स्टेडियमवर करण्याविषयी चर्चा अपेक्षित आहे. बीसीसीआयने तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचे धोरण अवलंबले. आयपीएलची सुरुवात यंदा २९ मार्चपासून मुंबईत होणार आहे.केद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेत बीसीसीआयसह सर्वच क्रीडा महासंघांना आरोग्य मंत्रालयाच्या सूचना अमलात आणण्याचे तसेच क्रीडा स्पर्धांदरम्यान गर्दी न जमविण्याचे निर्देश दिले आहेत. क्रीडा मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार, कुठल्याही स्पर्धेदरम्यान चाहत्यांची गर्दी जमणार नाही, याची खातरजमा करा. क्रीडा आयोजन टाळणे शक्य नसेल तर प्रेक्षक जमणार नाहीत याची काळजी घेत आयोजन करा, या आशयाच्या सूचना दिल्याची माहिती क्रीडा सचिव श्याम जुलानिया यांनी दिली.१५ एप्रिलपर्यंत विदेशी खेळाडूंवर निर्बंधव्हिसा बंदीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत. आयपीएल रिकाम्या स्टेडियममध्ये करण्याची शक्यता असली तरी ही लीग रद्द होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्याा सामन्यात जवळपास ६० विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत. बीसीसीआय सूत्रांनी सांगितले की, आयपीएलमध्ये खेळणारे विदेशी खेळाडू बिझनेस व्हिसा श्रेणीत मोडतात. सरकारच्या निर्देशानुसार त्यांना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा नाकारण्यात आला आहे. महाराष्टÑ आणि कर्नाटक सरकारने आधीच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या स्थानिक सामन्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.