ललित झांबरे
डॉट बॉल खेळण्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघाचा हात कुणीच धरु शकणार नाही. तसे टी-20 क्रिकेटमध्ये डॉट बॉल (निर्धाव चेंडू) हे नकोसेच असतात पण या नकोशा गोष्टीबद्दल नाईट रायडर्सच्या फलंदाजांना जरा जास्तच प्रेम दिसतेय. बुधवारी रॉयल चॅलेंजर्सविरुध्द (RCB) ते तब्बल 72 डॉट बॉल खेळले. मुळात सामनाच 120 चेंडूंचा. त्यापैकी 72 डॉट बॉल. दुसऱ्या शब्दात 20 पैकी 12 षटकं निर्धाव. म्हणजे त्यांनी 8 गडी गमावून ज्या 84 धावा केल्या त्या प्रत्यक्षात फक्त 40 चेंडूतच निघाल्या. 72 चेंडू निर्धाव आणि 8 गडी बाद ते आणखी आठ निर्धाव..म्हणजे 80 चेंडू असेच गेले.
मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) दोन आणि वॉशिंग्टन सुंदर व ख्रिस मॉरिसने प्रत्येकी एक अशी डावात चार षटकं निर्धाव गेली. आयपीएलच्या (IPL) इतिहासात प्रथमच डावात दोनपेक्षा अधिक षटके निर्धाव गेली. त्यामुळे एकूण 72 चेंडू निर्धाव गेले यात नवल नाही. आणि नाईट रायडर्ससाठी ही नवीन गोष्टसुध्दा नाही. कारण याच्यापेक्षाही अधिक 'डॉट बॉल' खेळून काढण्याचा नकोसा पराक्रम त्यांनी केलेला आहे.
गेल्या वर्षी चेन्नईविरुध्दच्या सामन्यात ते तब्बल 75 डॉट बॉल खेळले होते. आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक 'डॉट बॉल' खेळायचा हा विक्रम आहे. अर्थातच तो सामनासुध्दा केकेआरने गमावलाच होता. त्यानंतर आता बंगलोरविरुध्दचे हे 72 डॉट बॉल दुसऱ्या क्रमांकावर येतात. दोन्ही वेळा संघ केकेआरचाच पण केकेआरचे डॉट बॉल प्रेम एवढ्यावरच थांबत नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये याच्याआधीचा सर्वाधिक डॉट बॉलचा जो डाव होता तोसुध्दा नाईट रायडर्सचाच होता. अबुधाबीतच मुंबई इंडियन्सविरुध्दच्या सामन्यात त्यांना 57 चेंडूंवर एकही धाव घेता आलेली नव्हती. अर्थातच तो सामनासुध्दा त्यांनी गमावला होता.