शारजाह : किंग्स इलेव्हन पंजाब संघ आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या आधारावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध (आरसीबी) गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विजयी मार्गावर परतण्यास प्रयत्नशील असेल.
पंजाबला सातपैकी सहा सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आणि प्लेऑफच्या आशा कायम राखण्यासाठी त्यांना कुठल्याही स्थितीत विजय मिळवावा लागेल. किंग्स इलेव्हन पंजाबने स्पर्धेतील एकमेव विजय आरसीबीविरुद्ध मिळविला होता.छोटे मैदान ख्रिस गेलसारख्या ‘सिक्सर किंग’साठी आदर्श ठरू शकते. या ४१ वर्षीय फलंदाजाला पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवणे सोपे होणार नाही, कारण तो अद्याप स्पर्धेत खेळलेला नाही. गेल गेल्या दोन सामन्यात खेळणार होता, पण पोटदुखीमुळे त्याला बाहेर बसावे लागले. आता तो पूर्णपणे फिट असल्यामुळे त्याच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे.