मुंबई : रविवारचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी सुपर डुपर संडे ठरला. एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीन सुपर ओव्हरचा खेळ पाहण्यास मिळाल्याने क्रिकेटप्रेमींनी रविवाची रात्र अक्षरश: गाजवली. पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये रंगला तो कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) यांच्यामध्ये. यामध्ये कोलकाताने एकतर्फी वर्चस्व राखले.
मात्र नंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि किंग्ज ईलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यातील सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाला आणि आणखी एक सुपर ओव्हर खेळविण्यात आला. यामध्ये मात्र पंजाबने सहज बाजी मारली. मात्र या थरारक सामन्यादरम्यान आणखी एक सामन रंगलेला तो युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांच्यामध्ये. यामध्ये युवीने आपल्या स्टाईलने उत्तर देत युझीला गप्पही केले.
मुंबईच्या १७६ धावांचा पाठलाग करताना पंजाबनेही १७६ धावा केल्या. पंजाब सहज बाजी मारेल असे दिसत होते, कारण निकोलस पूरन जबरदस्त फटकेबाजी करत होता. मात्र अंतिम षटकामध्ये पंजाबकडून काही चुका झाल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये खेळविण्यात आला.
पण, या सामन्यातील पूरनची खेळी पाहून युवी प्रभावित झाला. आयपीएलमध्ये युवी पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघाकडून खेळला आहे. पूरनच्या फलंदाजीचे कौतुक करताना युवीने ट्वीट केले की, ‘आजचा सामना पूरनच्या नावावर होणार, असे दिसते. तो शानदारपणे बॅट फिरवतोय. त्याची फलंदाजी पाहणे नयनरम्य आहे. त्याच्या खेळीमुळे मला कोणाची तरी आठवण येत आहे. गेम ऑन! मला असं वाटते की, पंजाब प्ले ऑफमध्ये खेळेल आणि अंतिम सामन्यात त्यांचा सामना मुंबई किंवा दिल्लीविरुद्ध होईल.’
यावर प्रतिक्रिया देत युझीने स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला. युझीने रिप्लाय केला की, ‘दादा, मग आम्ही भारतात येऊ का?’ यावर युझीला सोडेल, तो युवी कसला. युवीने जोरदार प्रत्युत्तर देताना म्हटले की, ‘अद्याप अजून काही षटकार खाऊन आणि विकेट्स घेतल्यानंतर ये.’
युझीदेखील त्यापुढचा. त्याने पुन्हा रिप्लाय केला की, ‘ठीक आहे, १० नोव्हेंबरपर्यंत विकेट्स घेतो आणि काही षटकारही खातो.’ १० नोव्हेंबरला आयपीएलची फायनल लढत होणार आहे. यावर युवीनेही जबरदस्त उत्तर दिले की, ‘नक्कीच! फायनल, नक्की बघून ये!’