Join us  

IPL 2020 : ‘एमआय’ची मैदानासोबत ट्विटरवरही फटकेबाजी; ‘जिकडे बसले आहात, तिकडेच रहा!’

तुफान रंगलेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी कच खाल्याने मुंबईचा निसटता पराभव झाला. आरसीबीने बाजी मारली असली, तरी त्यांना विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 4:03 PM

Open in App

मुंबई : Indian Premier League (IPL 2020) मधील दुसरा सुपर ओव्हर रंगला तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये. तुफान रंगलेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी कच खाल्याने मुंबईचा निसटता पराभव झाला. आरसीबीने बाजी मारली असली, तरी त्यांना विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले.

या थरारक सामन्यादरम्यान सोशल मीडीयावरही जबरदस्त तणाव निर्माण झालेला. त्यात मुंबई इंडियन्सच्या टीमने केलेल्या ट्वीटने तर धुमाकुळच घातला. चक्क मराठीतून ट्वीट केल्याने अनेक नेटिझन्सनी ‘एमआय’ने केलेल्या अवाहनाला साद दिली. अखेर विजय झाला तो आरसीबीचा, पण मनं जिंकली होती मुंबई इंडियन्सने.

आरसीबीच्या २०१ धावांचा पाठलाग करताना मुंबईची ४ बाद ७८ अशी अवस्था झाली होती. किशन आणि पोलार्ड यांनी पाचव्या गड्यासाठी ११९ धावांची भागीदारी करत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. परंतु, अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर किशन बाद झाला आणि त्यानंतर पोलार्डने चौकार मारत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. किशनचे शतक एका धावेने हुकले, तर पोलार्डने केवळ २४ चेंडूंत नाबाद ६० धावांचा तडाखा दिला.

मुंबईला २ चेंडूंत ५ धावांची गरज असताना किशन ९९ धावांवर झेल बाद झाला आणि त्यानंतरच्या चेंडूवर पोलार्डने चौकार मारत सामना सुपरओव्हरमध्ये नेला. यादरम्यान सोशल मीडीयावर लक्ष वेधले मुंबई इंडियन्सने. मुंबईला अखेरच्या चार षटकांत ७९ धावांची गरज असताना पोलार्डने १७व्या षटकात २७ धावा लुटल्या. यादरम्यान मुंबई इंडियन्सने चाहत्यांना आवाहन करताना ट्वीट केले की, ‘जिकडे बसले आहात, तिकडेच रहा.’

मुंबई इंडियन्सच्या या आवाहनाला चाहत्यांनीही प्रचंड लाईक्स केले. अनेकांनी प्रतिसाद देताना आम्ही जागा अजिबात बदलली नसल्याचे सांगितले. पोलार्ड-किशन यांनी सामना अवाक्यात आणल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडीयनसने रिट्वीट करत आधीच्या आवाहनाची आठवण करुन दिली. बॉल टू बॉल ट्वीट करत मुंबई इंडियन्सने चाहत्यांचे मनोरंजन केले. अखेरच्या क्षणामध्ये ट्वीटवर गणपती बाप्पा मोरया असा गजरही झाला, मात्र अखेर सरशी झाली ती आरसीबीची. 

 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्स