मुंबई: मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पुढील मोसमासाठीच्या संघातून युवराज सिंगला वगळले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवी जगभरातील अनेक लीग मध्ये खेळत आहे. आज तो टी 10 लीग मधून पदार्पण करणार आहे. पण तत्पूर्वी त्याला मुंबईने मोठा धक्का दिला. मागील मोसमात मुंबईने नाट्यमय घडामोडीनंतर युवीला मुळ किमतीत करारबद्ध केले होते. युवीसह मुख्यने एव्हीन लुईस, ॲडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, बरींदर सरन, बेन कटींग आणि पंकज जैस्वालला करारमुक्त केले.
दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सच्या माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. शिवाय मुंबई इंडियन्सनेही ट्रेंट बोल्टला आपलेसे केले आहे. आयपीएल 2020च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. तत्पूर्वी ट्रेड ( अदलाबदली) करून संघ त्यांना हवा तो खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल करून घेत आहेत. सनरायझर्स हैदराबादनेही युसूफ पठाण, शकीब अल हसन, मार्टिन गुप्तील, दीपक हूडा आणि रिकी भूई यांना करारमुक्त केले. फिक्सिंग प्रकरणाची माहिती न दिल्यामुळे शकिबवर आयसीसीन बंदी घातली आहे. त्यामुळे तो आयपीएलला मुकणार होता.
आतापर्यंत दिल्लीनं सर्वाधिक खेळाडूंची अदलाबदल केली आहे. यात चेन्नई सुपर किंग्सचे नाव कुठेच दिसत नाही. पण, गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सने त्याबाबतचे मोठे संकेत दिले होते आणि त्यानुसार त्यांनी पाच खेळाडूंना रिलिज केले. चेन्नई सुपर किंग्सने एक ट्विट केलं. त्यात त्यांनी पाच खेळाडूंना रिलिज करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला यंदा संघाबाहेर करू शकतात. 7.80 कोटी रक्कम मोजलेल्या केदारला संघासाठी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. केदारसह अंबाती रायुडू, करन शर्मा, सॅम बिलींग आणि मुरली विजय यांना डच्चू दिल जाऊ शकतो, असा तर्क लावला जात होता. पण, यापैकी सॅम बिलींगचा अंदाज खरा ठरला. त्याच्याशिवाय चैतन्य बिश्नोई, ध्रुव शोरेय, डेव्हीड विली आणि मोहित शर्मा यांना डच्चू आहे.