- स्वदेश घाणेकरकोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) UAEत खेळवण्याचा धाडसी निर्णय BCCIनं घेतला. बीसीसीआयनं हे आव्हान नुसते पेललं नाही, तर ते यशस्वी करूनही दाखवलं. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) जेतेपदाचा मान पटकावला. अंतिम सामन्यात एकतर्फी निकाल नोंदवताना रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) संघानं प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) पाच विकेट्स राखून विजय मिळवला. MIनं पाचव्यांदा आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावला. आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही आणि कर्णधार म्हणून रोहितनंही पाचवे जेतेपद उंचावून विक्रमी कामगिरी केली.
गतविजेते म्हणून मुंबई इंडियन्सलाIPL 2020चा सलामीचा सामना खेळण्याचा मान मिळाला आणि त्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं त्यांना पराभवाची चव चाखवली. त्यात २०१४मध्ये यूएईत मुंबई इंडियन्सला पाचही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे सुरुवातीला जेतेपदाच्या शर्यतीत MI आघाडीवर नव्हतेच. सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर आणि पहिल्या टप्प्यात दमदार खेळ करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवरच होते. पण, ऐन मोक्याच्या क्षणी माती खाण्याची परंपरा RCBनं कायम राखली आणि एलिमिनेटरमध्येच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. RCB, DC, SRH आदी संघाकडे अशी कोणती गोष्ट नाही, जी MIकडे आहे आणि त्याच्याच जोरावर ते यशस्वी ठरले.
मुंबई इंडियन्सकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा खेळाडूंवरील विश्वास... प्रत्येक संघानं निकालानुसार आपापल्या संघात अदलाबदल केले. पण, दुखापत किंवा विश्रांती हे कारण वगळल्यास मुंबईच्या संघात फार बदल पाहायला मिळाले नाही. जसप्रीत बुमराह हा हुकमी एक्का त्यांच्याकडे होताच, परंतु लसिथ मलिंगानं माघार घेतल्यानं त्याला तोलामोलाची साथ कोण देईल, हा प्रश्न MIला सतावत होता. ट्रेंट बोल्टनं ती उणीव भरून काढली. नॅथन कोल्टर नायल आणि जेम्स पॅटिन्सन यांनी ती उणीव भरून काढली. जसप्रीतनं १५ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानवर राहिला. बोल्ट, कोल्टर-नायल व पॅटिन्सन यांनी अनुक्रमे २५ ( १५ सामने), ५ ( ७ सामने) व ११ ( १० सामने) विकेट्स घेतल्या. विकेट घेण्याबरोबरच या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या धावांवरही वेसण घातलं.