अबुधाबी : गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सला सध्याच्या सत्रात हरविण्यासाठी अन्य संघांना चांगलाच घाम गाळावा लागतो. दिल्ली संघाला काल याची प्रचिती आली. स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी विजयी लय कायम राखावी लागेल, असे मत कर्णधार रोहित शर्मा याने विजयानंतर व्यक्त केले.
‘आमची कामगिरी चांगली होत असून पुढे अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे. अखेरच्या टप्प्यात काय घडते हे सर्वांना ठाऊक आहे. आम्ही ज्या योजना आखल्या त्यानुसार वाटचाल सुरू आहे. ही अखेर नाही आणि सुरुवातदेखील नाही. प्रत्येक विजय हा पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास प्रदान करतो. स्पर्धेच्या मध्यभागी असल्याने एकाग्रतेने खेळावेच लागेल’ असे सात सामन्यात २१६ धावा ठोकणाऱ्या रोहितने सांगितले.जखमी ऋषभ पंत आठवडाभर बाहेरअबुधाबी : दिल्ली कॅपिटल्सचा यष्टिरक्षक-फलंदाज पंत याच्या जांघेच्या मांसपेशी दुखावल्या आहेत. डॉक्टरांनी पंतला आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे तो खेळू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध शुक्रवारच्या सामन्यात पंत जखमी झाला होता. तो मुंबईविरुद्ध काल खेळू शकला नाही. त्याच्याजागी आॅस्ट्रेलियाचा अॅलेक्स केरी याला संधी देण्यात आली.‘मार्कस् स्टोईनिस धावबाद झाल्याने सामना फिरला. आम्ही १०-१५ धावांनी माघारलो. धावबाद होणे तसेच क्षेत्ररक्षणावर मंथन करणार आहोत. पुढचा सामना खेळण्याआधी मानसिकता सुधारावी लागेल. जखमी ऋषभ खेळण्यास कधी उपलब्ध होईल, हे मात्र सांगू शकत नाही.’ -श्रेयस अय्यर, कर्णधार दिल्ली