-ललित झांबरे
आयपीएल (IPL) हे तरुण नवोदीत खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ आहे असे मानले जाते. राहुल तेवतिया (Rahul Tewatia), शुभमान गील (Shubhaman Gill) , शिवम मावी (Shivam Mavi) , वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarty), नटराजनसारखे खेळाडू हे दाखवून देत आहेत. त्यातल्यात्यात आयपीएल 2020 मध्ये तर आधीच्या स्पर्धांच्या तुलनेत नवोदित खेळाडू अधिकच चमकत आहेत.
यंदाच्या आयपीएलचे आतापर्यंत 27 म्हणजे निम्मे सामने झाले आहेत आणि या टप्प्यावर आतापर्यंत जे 27 सामनावीर आहेत त्यापैकी 9 खेळाडू असे आहेत ज्यांनी 10 पेक्षा कमी किंवा अजिबातच आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळलेले नाहीत पण ते सामनावीर ठरले आहेत. गेल्यावर्षीच्या पूर्ण आयपीएलमध्ये केवळ असे सहाच खेळाडू होते. यंदा निम्म्या टप्प्यापर्यंतच असे 9 सामनावीर आहेत त्यांनी 10 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
त्यात राजस्थान रॉयल्सचा संजू सॕमसन हा दोन वेळा सामनावीर ठरला आहे तर याच संघाचा राहुल तेवतिया, मुंबई इंडियन्सचा सुर्यकुमार यादव, कोलकाता नाईट रायडर्सचा शिवम मावी, राहुल त्रिपाठी, शुभमान गील, सनरायजर्सचा प्रियम गर्ग, दिल्ली कॅपिटल्सचा पृथ्वी शॉ आणि सीएसकेचा अंबाती रायुडू यांचा समावेश आहे.