ठळक मुद्देआयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माने आपली ओळख निर्माण केली आयपीएलमध्ये रोहितने धोनीविरुद्धच आपल्यातील नेतृत्त्व गुण सादर करत सर्वांनाच प्रभावित केलेरोहितने नेतृत्त्व कौशल्य शिकले ते ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग या माजी दिग्गज कर्णधाराकडून
मुंबई - Indian Premier League (IPL 2020) मधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit Sharma) आपली ओळख निर्माण केली. त्याच्या कारकिर्दीला मुख्य वळण लागले ते महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वात खेळताना. यानंतर आयपीएलमध्ये त्याने धोनीविरुद्धच आपल्यातील नेतृत्त्व गुण सादर करत सर्वांनाच प्रभावित केले. रोहितने आपल्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) चार वेळा जेतेपद मिळवून दिले, तर धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईला (Chennai Superkings) तीन जेतेपद मिळवता आले. मात्र असे असले, तरी रोहितने नेतृत्त्व कौशल्य शिकले ते ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज कर्णधाराकडून. याबाबत खुद्द रोहितनेच माहिती दिली.
संघातील प्रत्येक खेळाडू महत्त्वपूर्ण असून तो संघासाठी किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव त्या खेळाडूला करुन देणे अत्यंत गरजेचे असते आणि हीच गोष्ट रोहित शिकला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्याकडून. एका इंग्रजी वृत्तसमूहाच्या कार्यक्रमात रोहितने कर्णधार म्हणून मिळालेले यश आणि आपले नेतृत्त्व कौशल्य याबाबत माहिती दिली. रोहित म्हणाला की, ‘कर्णधार म्हणून मी एक गोष्ट कायम जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की, संघातील प्रत्येक खेळाडू कशाप्रकारे योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर माझीही कामगिरी चांगली व्हावी, याकडे लक्ष देतो. अंतिम संघात माझ्यासोबत खेळणारे दहा खेळाडू आणि बेंचवर बसलेले इतर खेळाडू या सर्वांसोबत चर्चा करण्याचा माझा प्रयत्न असतो. ही गोष्ट मी शिकलो ते रिकी पाँटिंगकडून. बेंचवर बसलेल्या खेळाडूंनाही ते संघासाठी महत्त्वाचे असल्याचे जाणीव करुन देणे गरजेचे असते, हे मी पाँटिंगकडून शिकलो.’
याआधी पाँटिंग यांनी मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्त्व केले असून काही काळ त्यांनी मुंबईच्या प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे. ‘पाँटिंगने मला सांगितले होते की, कर्णधार म्हणून इतरांकडून कशी कामगिरी करुन घेता येईल, केवळ असाच विचार करुन चालणार नाही. तुला नेहमी त्यांच्याशी चर्चा करत रहावे लागेल. पाँटिंग जेव्हा मुंबई इंडियन्सचे सदस्य होते, तेव्हा त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकण्यास मिळाल्या.’
Web Title: IPL 2020: Not Dhoni, but Rohit learns leadership skills from Ricky Ponting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.