मुंबई : आधीच फलंदाजांचा फॉर्म हरपलाय, त्यात गोलंदाजी कमकुवत आणि अशा परिस्थितीत सामना करायचा आहे तो गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians). याच दडपणाखाली आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) संघ मैदानावर उतरेल. एबी डिव्हिलियर्स सोडला, तर त्यांचा एकही हुकमी फलंदाज अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळेच कर्णधार कोहली (Virat Kohli) फॉर्ममध्ये येणे आरसीबीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. दुसरीकडे, मुंबईचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) हा चांगलाच फॉर्ममध्ये असून त्याला आयपीएलमध्ये महत्त्वाचा विक्रम करण्यासाठी केवळ १० धावांची गरज आहे.
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात आज तुंबळ लढाई पाहण्यास मिळेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक विजय आणि एक पराभव पत्करलेला आहे. त्यातही मुंबईची बाजू काहीशी चांगली आहे, कारण त्यांनी आपला अखेरचा सामना जिंकला आहे, तर आरसीबीला आपल्या अखेरच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच मुंबईचे पारडे वरचढ मानले जात आहे.
कोहलीला आतापर्यंत आपल्या दोन्ही सामन्यांत मोठ्या खेळी करण्यात यश आले नाही. दुसºया सामन्यात केवळ एक धाव काढून बाद झाल्यानंतर त्याच्यावर टीकाही झाली. त्याचवेळी दुसरीकडे, रोहित शर्माने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध झालेला पराभव मागे टाकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तडाखेबंद अर्धशतक ठोकत सर्वांनाच इशारा दिला आहे.
या दोन्ही खेळाडूंना आजच्या लढतीत विक्रम नोंदवण्याची संधी आहे. कोहलीने मुंबईविरुद्ध ८५ धावा केल्यास तो टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावा पूर्ण करेल. असे झाल्यास टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावा करणारा कोहली पहिला भारतीय ठरेल. त्याचप्रमाणे रोहित शर्माकडेही विक्रमाची संधी असून त्याने आरसीबीविरुद्ध १० धावा केल्यास तो आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण करेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोहली आणि सुरेश रैआ यांनी ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे आरसीबीविरुद्ध १० धावा केल्यानंतर रोहित कोहली आणि रैना यांची बरोबरी करेल. कोहलीच्या नावावर सर्वाधिक ५,४२७ धावांची नोंद असून त्यानंतर रैनाने ५,३६८ धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर सध्या ४,९९० धावा आहेत.