अबूधाबी: आयपीएल २०२० मध्ये (IPL 2020) दोन पराभवांमुळे गुणतालिकेत घसरण झालेल्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) काल किंग्स इलेव्हन पंजाबवर (Kings XI Punjab) ४८ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे मुंबईनं गुणतालिकेत थेट अव्वल स्थानावर झेप घेतली. कर्णधार रोहित शर्मा, किएरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांच्या फटकेबाजीमुळे मुंबईनं १९१ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करत पंजाबला १४३ धावांवर रोखलं. त्यामुळे ४ सामन्यांत २ विजयांसह आता गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे.
कालचा सामना मुंबईसाठी विशेष ठरला. कर्णधार रोहित शर्मानं आयपीएलमध्ये ५ हजारांचा टप्पा ओलांडला. रोहितनं शानदार अर्धशतक झळकावत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यावर पोलार्ड आणि हार्दिकनं कळस चढवला. शेवटच्या काही षटकांमध्ये दोघांनी पंजाबच्या गोलंदाजीवर घणाघाती हल्ला चढवला. रोहित बाद झाल्यानंतर पोलार्ड आणि हार्दिकनं २३ चेंडूंत ६७ धावांची अभेद्य भागिदारी रचली. पोलार्डनं २० चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४७ धावा चोपून काढल्या. तर हार्दिकनं ११ चेंडूमध्ये ३ चौकार २ षटकारांसह ३० धावा कुटल्या.
१९२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबला मुंबईच्या गोलंदाजांनी ठराविक अंतरानं धक्के देण्यास सुरुवात केली. फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुल आणि मयंक अगरवालला लवकर माघारी धाडून मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबला अडचणीच आणलं. बोल्टचा अपवाद वगळता इतर सर्वच गोलंदाजांनी किफायती गोलंदाजी केली. जेम्स पॅटिनसन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर कृणाल पांड्या आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.
आयपीएलमध्ये सर्वाधिक फलंदाजांना बाद करणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. सध्या पंजाबच्या मोहम्मद शमीकडे पर्पल कॅप आहे. त्यानं ४ सामन्यांत ८ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. या यादीत दिल्लीचा रबाडा (३ सामन्यांत ७ विकेट्स) दुसऱ्या स्थानी आहे. काल राहुल आणि मॅक्सवेलला बाद करणारा मुंबईचा राहुल चहार तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं ४ सामन्यांत ६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.
विशेष म्हणजे सर्वाधिक फलंदाजांना बाद करणाऱ्या यादीवर नजर टाकल्यास पहिल्या १० पैकी ४ गोलंदाज एकट्या मुंबईचे आहेत. यात राहुल चहारसह ट्रेंट बोल्ट (६ विकेट्स पाचवं स्थान), जेम्स पॅटिनसन (५ विकेट्सह आठवं स्थान) आणि जसप्रीत बुमराह (५ विकेट्ससह नववं स्थान) यांचा समावेश आहे. या यादीत मुंबईनंतर पंजाबचे सर्वाधिक ३ खेळाडू आहेत. शमीसह शेल्डन कॉट्रेल (चौथं स्थान), मुरुगन अश्विन (दहावं स्थान) यांचा पहिल्या १० गोलंदाजांमध्ये समावेश आहे.
Web Title: IPL 2020 Purple Cap Mohammad Shami leads the table dominated by Mumbai indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.