मुंबई : सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. बुधवारीच झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) १३ धावांनी बाजी मारत दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दिल्लीने हे यश सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळवले आहे. संघाचे फलंदाज जितकी शानदार कामगिरी करत आहेत, त्याच तोडीची कामगिरी गोलंदाजही करत आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी असून पर्पल कॅपवर सध्या दिल्लीच्याच कागिसो रबाडाचा (Kagiso Rabada) कब्जा आहे. मात्र हे दोन्ही पुरस्कार डोळ्यांत धूळ फेकण्यासारखे असल्याचे सांगत दिल्लीच्याच अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सर्वांचे लक्ष वेधले आहे.आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप, तर सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देऊन गौरविण्यात येते. मात्र, हा पुरस्कार मिळवताना संघाच्या विजयात योगदान देता येत नसेल, तर या पुरस्काराची काहीच किंमत राहत नाही, असे मत अश्विनने व्यक्त केले. सध्या ऑरेंज कॅप शर्यतीत दिल्लीचा कर्णधार अय्यर तिसºया स्थानी आहे, तर रबाडाने 8 सामन्यांतून १८ बळी घेत पर्पल कॅप सध्या तरी स्वत:कडे राखून ठेवली आहे.सध्या अश्विन यूट्यूबवर ‘हॅलो दुबइया’ नावाचा शो घेऊन येत आहे. यावर त्याने आपल्या एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना आपले मत मांडले. अश्विन म्हणाला, ‘जो पर्यंत खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्याच्या आपल्या भूमिकेला न्याय देत नाही, तोपर्यंत ऑरेंज कॅप, पर्पल कॅप यासारख्या पुरस्कारांना अर्थ राहत नाही. हे दोन्ही पुरस्कार डोळ्यांमध्ये धूळ फेकण्यासारखे आहेत.’ सर्वाधिक धावा फटकावणाऱ्यांसाठी असलेल्या ऑरेंज कॅप शर्यतीतील पहिल्या दोन्ही स्थानी लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांचा कब्जा आहे. मात्र या दोघांचा संघ किंग्ज ईलेव्हन पंजाब सध्या गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020: ऑरेंज कॅप, पर्पल कॅप हे दोन्ही पुरस्कार डोळ्यांत धूळ फेकण्यासारखे; सांगतोय स्टार फिरकीपटू
IPL 2020: ऑरेंज कॅप, पर्पल कॅप हे दोन्ही पुरस्कार डोळ्यांत धूळ फेकण्यासारखे; सांगतोय स्टार फिरकीपटू
IPL 2020 Ravichandran Ashwin: सध्या पर्पल कॅप कागिसो रजाडा, तर ऑरेंज कॅप लोकेश राहुलकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 3:13 PM