अबुधाबी : रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे सलग तिसऱ्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. मुबंई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघांचे लक्ष्य इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविण्यावर केंद्रित झाले आहे. उभय संघांदरम्यान बुधवारी चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. मुंबई संघाला यापूर्वीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईच्या खात्यावर १४ गुणांची नोंद आहे. विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या खात्यावरही १४ गुण आहेत. त्यांना रविवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. बुधवारी विजय मिळविणाऱ्या संघाचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होईल.
रोहितचा फिटनेस चर्चेचा विषय आहे. स्नायूच्या दुखापतीमुळे तो यापूर्वीच्या दोन सामन्यांना मुकला. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने सोमवारी नेट्समध्ये सराव केला. योगायोगाने त्याच दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघात त्याची निवड झाली नाही.
आरसीबीविरुद्ध जास्त बदल करण्याची गरज नाही - बुमराहअबधाबी : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध पुढील सामन्यात संघाच्या गोलंदाजी संयोजनामध्ये विशेष बदल करण्याची गरज नाही, असे मत राजस्थान रॉयल्सविरुद्ध गेल्या लढतीत मोठ्या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरलेला मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केले.बेन स्टोक्स व संजू सॅमसन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर राजस्थानने मुंबईविरुद्ध १९६ धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. बुमराह म्हणाला, ‘आम्ही खूश आहोत. आमची रणनीती स्पष्ट आहे. त्यामुळे बरेच बदल करण्याची गरज आहे, असे वाटत नाही. त्यासाठी प्रतिस्पर्धी संघाने सरस कामगिरी केली. त्यामुळे त्यांची प्रशंसा करावीच लागेल.’ बुमराह पुढे म्हणाला, ‘यंदाच्या मोसमात आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन एवढेच नव्हे तर नाथन कुल्टर नाईल यांच्या साथीने गोलंदाजी करणे नेहमीच आवडते. आम्ही बऱ्याच बाबींवर चर्चा करतो.’