दुबई: कर्णधार लोकेश राहुलची डोळ्याची पारणं फेडणारी फटकेबाजी, वेगवान गोलंदाजांचा भेदक मारा आणि त्यानंतर फिरकीपटूंनी विणलेलं जाळं यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर तब्बल ९७ धावांनी विजय मिळवला. लोकेश राहुलच्या धडाकेबाज नाबाद १३२ धावांमुळे पंजाबनं २०६ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा सामना करताना आरसीबीच्या संपूर्ण संघाला मिळून राहुलनं केलेल्या धावादेखील करता आल्या नाहीत. त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या १०९ धावांत तंबूत परतला.
नाणेफेक जिंकून
विराट कोहलीनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर आलेले निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेलदेखील फारशी चमक दाखवू शकले नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूनं राहुलची शानदार फटकेबाजी सुरू होती. राहुल शतकाजवळ असताना विराटनं दोनदा त्याचे झेल सोडले. त्यानंतर राहुलनं थेट टॉप गियर टाकला. त्यामुळे अखेरच्या पाच षटकांमध्ये ७० हून अधिक धावांचा पाऊस पडला.
राहुल, नाम तो सुनाही होगा! विराट, रोहितला जमलं नाही, ते या पठ्ठ्यानं करून दाखवलंराहुलच्या १३२ धावांच्या नाबाद खेळीमुळे पंजाबनं २०६ धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या ४ धावांमध्ये आरसीबीचे ३ फलंदाज माघारी परतले.
विराट कोहली अवघी १ धाव काढून बाद झाला. मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रेल यांनी सुरुवातीलाच पंजाबला धक्के दिले. यानंतर फिंच आणि डिव्हिलयर्सनं ४९ धावांची भागिदारी रचली.
राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडलेयानंतर पंजाबच्या फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी करत आरसीबीची मधली फळी उद्ध्वस्त केली. रवी बिश्नोईनं २० धावांवर फिंचचा त्रिफळा उडवला. मुरुगन अश्विननं डिव्हिलियर्सला २८ धावांवर बाद केलं. प्रमुख फलंदाज माघारी परतत असताना वॉशिंग्टन सुंदरनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिश्नोईनं ३० धावांवर त्याची खेळी संपवली. बिश्नोई आणि अश्विननं प्रत्येकी ३ गडी बाद केले. आरसीबीचा संपूर्ण डाव १०९ धावांवर संपुष्टात आला.
पंजाबच्या विजयात मोलाचं योगदान देणाऱ्या कर्णधार लोकेश राहुलला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या मोठ्या विजयामुळे पंजाबनं गुणतालिकेत थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर आरसीबीची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. दारुण पराभवामुळे आरसीबीचा नेट रनरेट उणे २.१७५ इतका झाला आहे.
Web Title: IPL 2020 RCB vs KXIP kl rahul hits century punjab crush bangalore by 97 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.