- ललित झांबरेक्रिकेटच्या सामन्यात चढउतार ही काही नवीन गोष्ट नाही. विशेषतः टी-20 (T20 cricket) सामन्यात तर एखादं षटकंच सामन्याचा नूर पालटू शकते. एखादी विकेट सामन्याला कलाटणी देऊ शकते. हे मान्य जरी असले तरी आयपीएल 2020 (IPL 2020). मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा (KXIP) संघ पाठलाग करताना जसे 'रोलर कोस्टर' सामने खेळतोय ते म्हणजे कमालच आहे. रॉयल चॅलेंजर्सवर (RCB). गुरुवारी मिळवलेला विजय हे याचे उत्तम उदाहरण आहे.
मुळात या सामन्यात एबीडी विलियर्स (AB devilliers) व विराट कोहली (Virat Kohli) यांना एकाच षटकात बाद केल्यावर रॉयल चॅलेंजर्सला ते दीडशेच्या आत रोखतील असा अंदाज होता पण डीविलियर्स व कोहली यांना ज्याने बाद केले त्याच मोहम्मद शामीच्या (Mohammed Shami) पुढच्याच षटकात 24 धावा चोपल्या गेल्या आणि आरसीबीला 171 धावांची आव्हानात्मक मजल मारता आली.
किंग्ज इलेव्हनने 172 च्या लक्ष्याचा पाठलाग करताना 15 षटकात 1 बाद 126 अशी मजल मारलेली म्हणजे 30 चेंडूत 46 धावा आणि नऊ गडी हाताशी अशी त्यांची मजबूत स्थिती होती. ख्रिस गेल व केएल राहुलसारखे फलंदाज खेळपट्टीवर होते. त्यामुळे पंजाब हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचाही अंदाज सामना 18 षटकांतच संपेल असा होता. पुढच्या दोन षटकात 35 धावा निघाल्याने तो खरा होईल अशीच चिन्हे होती.
18 चेंडूत फक्त 11 धावा होत्या मात्र त्यानंतर पंजाबला दोन षटकात फक्त नऊ धावांची भर घालता आली आणि अखेरच्या षटकात तर फक्त दोन धावा हव्या होत्या. 6 चेंडूत फक्त दोन धावा हव्या, गेल व राहुलसारखे फलंदाज खेळायला तरी सामना शेवटच्या चेंडूवर गेला. गेल धावबाद झाल्यावर निकोलस पूरनने आल्या आल्या युझवेंद्र चहलला षटकार लगावला म्हणून पंजाबला हा सामना जिंकता आला, अन्यथा त्यांना पराभव पत्करावा लागला असता.
याआधी दिल्ली कॅपिटल्साविरुध्दच्या सामन्यातही 157 धावांचा पाठलाग करताना 5 बाद 55 अशा स्थितीतून त्यांनी सामना टाय केला होता. शेवटच्या चार षटकात 52 धावा चोपून काढल्या होत्या पण सुपर ओव्हरमध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती.
कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द तर 165 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडूत 29 धावा आणि फक्त एकच गडी बाद अशा स्थितीतूनही त्यांनी 'पराभव' खेचून आणला होता. 115 धावांची सलामी मिळालेला हा सामना त्यांनी फक्त दोन धावांनी गमावला होता.
इजा, बिजा झाल्यानंतर गुरुवारी रॉयल चॅलेंजर्सविरुध्द तिजा होतो की काय अशी चिन्हे होती. 18 व्या षटकात चार आणि 19 व्या षटकात पाचच धावा करत ते पायावर धोंडा पाडून घेणार होते. पण नशिबाने पुरनने शेवटच्या चेंडूला षटकार हाणला आणि पंजाबचा पाठलाग करताना पराभवाचा 'इजा, बिजा, तिजा' टळला.