भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमधील बक्षीस रक्कम निम्म्यानं कमी केली. त्यांच्या या निर्णयामागे कॉस्ट कटिंग असल्याचा दावा केला जात आहे. याआधी बीसीसीआयनं उद्धाटन सोहळ्यात होणारा खर्च वाचवण्यासाठी सोहळाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता बक्षीस रक्कम कमी करून बीसीसीआय आणखी पैसै वाचवण्यासाठी निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. पण, बीसीसीआयनं या सर्व चर्चा खोडून काढल्या. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी बक्षीस रक्कम कमी करण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
यंदा विजेत्या संघाला 10 कोटी बक्षीस म्हणून मिळतील. 2019च्या विजेत्या संघाला 20 कोटी देण्यात आले होते. उपविजेत्या संघाला 12.5 कोटी ऐवजी 6.25 कोटी देण्यात येणार आहेत. क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी 4.375 कोटी रुपये मिळणार आहेत. पण, यामागे एक मुख्य कारण आहे. पटेल म्हणाले,''ही कॉस्ट कटिंग नाही. 2013-14मध्ये काही फ्रँचायझींनी आमच्याकडे मदत मागितली होती. तेव्हा आम्ही बक्षीस रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हा मुद्दा मुख्य करारात समाविष्ठ नव्हता.''
''2013मध्ये आयपीएलमधून हवा तसा आर्थिक फायदा मिळन नसल्याचे फ्रँचायझींनी सांगितले होते. तेव्हा त्यांनी आमच्याकडे मदत मागितली होती. तेव्हा खेळाडूंच्या पगाराचा मुद्दा उपस्थित होऊ नये, यासाठी बीसीसीआयनं मदत करण्याचा निर्णय घेतला. आता फ्रँचायझींना मोठा फायदा होत आहे. त्यामुळे बक्षीस रक्कम कमी करण्यात आली आहे,'' असे त्यांनी सांगितले.
फ्रँचायझींमध्ये नाराजीबीसीसीआयच्या या निर्णयाला फ्रँचायझींनी नाराजी प्रकट केली आहे. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी साधी चर्चाही न केल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. ''याबाबत आमच्याशी कोणतीच चर्चा झाली नाही. आम्ही भागधारक आहोत आणि त्यामुळे असा निर्णय घेताना आम्हाला विचारात घ्यायला हवे होते. बीसीसीआयसोबतची ही जुनीच समस्या आहे,''अशी प्रतिक्रिया एका फ्रँचायझींनी दिली.