आयपीएलमध्ये कोणत्याही गोलंदाजाने आपल्या चार षटकांत ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा दिल्या तर सोशल मिडियावर त्याची खिल्ली उडवली जाते. पण त्यासोबतच अशोक डिंडाचीही खिल्ली उडतेच. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांमध्ये अशोक डिंडाचा समावेश आहे. त्यामुळे ‘डिंडा अकॅडमी’ म्हणून त्याची वेगळी ओळख सोशल मिडियात ट्रोलर्सनी निर्माण केली आहे. मात्र आता श्रीलंकेचा इसरु उदाना हा त्याच्यासाठी मैदानात उतरला आहे. उदानाने ट्रोलर्सला इन्स्टग्राम स्टोरीत चांगलेच फैलावर घेतले.
अशोक डिंडा याने २०१३ च्या सत्रात मुंबई इंडियन्स विरोधातील सामन्यात पुणे वॉरीयर्स इंडियाकडून खेळताना ४ षटकांत तब्बल ६३ धावा दिल्या होत्या. त्यानंतर देखील त्याने २०१७ मध्ये रायजींग पुणे सुपरजायट्ंस कडून खेळताना अशाच प्रकारे धावा दिल्या होत्या. त्यामुळे जेव्हाही आयपीएलमध्ये कोणताही गोलंदाज अशा प्रकारे धावा देतो. तेव्हा डिंडा उद्धार नक्कीच होतो. आता त्यावर उदाना मात्र चिडला आहे.
श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज असलेल्या उदानाने यंदाच्या सत्रात आपला आयपीएलमधील पहिला सामना खेळला. त्यात त्याने ४५ धावा देत दोन गडी बाद केले. मात्र काही ट्रोलर्सनी त्यालाह डिंडा अकॅडमीत स्थान दिले. मात्र त्यामुळे चिडलेल्या उदानाने इन्स्टाग्राम स्टोरीत टिका केली आहे. ‘कुणाचीही पुर्ण माहिती नसेल तर त्याच्यावर टिका करू नका.’ असे त्याने म्हटले आहे.
अशोक डिंडा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२, टीटष्ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये १७, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४२०, लिस्ट ए मध्ये १५१ आणि आयपीएलसह इतर ट्वेंटी-20मध्ये १४६ बळी घेतले आहेत. त्याने एकूण ७४६ बळी घेतले आहेत. त्याने आयपीएलच्या २०१७ च्या सत्रापर्यंत पाच विविध संघांकडून खेळ केला. रणजीमध्ये तो अनेक वर्षे बंगालच्या संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. उदानाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत याचाही समावेश केला आहे.