दुबई: ‘रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. यावरुन बराच वाद पुढे आला. सर्व वादविवाद बाजूला सारून एका गोष्टीत समाधान मानायला हवे की रोहित शर्मा तंदुरुस्त आहे. रोहित पूर्ण बरा होण्याआधीच मैदानावर उतरण्याची घाई करतो आहे असेही काहींना वाटते, पण रोहित मात्र स्वतः मैदानावर उतरल्यापासून खूपच चांगला वाटला. त्याने ३० यार्डात आणि सीमारेषेवर चतुरस्त्र क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे सध्या तरी तो तंदुरुस्त आहे याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे,’ असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मांडले.
भारताचा नोव्हेंबर अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होईल. या दौऱ्यासाठी धक्कादायकरीत्या रोहित शर्माला वगळण्यात आले. रोहित दुखापतग्रस्त असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आले नसल्याचेदेखील निवड समितीने स्पष्टीकरण दिले होते. पण आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात मात्र रोहित खेळला. आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचेही त्याने सांगून टाकले. यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीच्या वक्तव्याचा आधार संपला. गावसकर यांनी या प्रकरणी मत व्यक्त करीत वाद संपविण्याचा प्रयत्न केला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कोण उपकर्णधार असेल हा सध्या वादाचा मुद्दा नाही. नेट्समध्ये सराव करताना तुम्हाला तंदुरुस्तीबाबत फारसा अंदाज येत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या सामन्यात खेळत असता त्यावेळी तुमच्यावर जबाबदारी असते. त्यामुळे तेव्हा तुम्ही किती तंदुरुस्त आहात याचा नीट अंदाज येतो.’
बीसीसीआय काय निर्णय घेणार
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखालील समितीने निवडलेल्या भारतीय संघाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे हा प्रश्न सर्व जण विचार होते. तो पुन्हा संघात येऊ शकतो का? असे असेल तर लोकेश राहुलला वनडे आणि टी-२०चा उपकर्णधार का? करण्यात आले? आदी प्रश्न विचारले जात होते. मुंबई इंडियन्सकडून सातत्याने हे संकेत दिले जात होते की, रोहितची दुखापत इतकी गंभीर नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हे स्पष्ट केले होते की, रोहित शर्माने फिटनेस सिद्ध केल्यास तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो.
Web Title: IPL 2020: Rohit should be happy to be fit - Sunil Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.