Indian Premier League ( IPL 2020) च्या सलामीच्या सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर अंबाती रायुडूने चेन्नई सुपरकिंग्जला कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला. आज त्याच रायुडूचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला.
वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेल्या रायुडूने मुंबईविरुद्ध पहिले दोन विकेट झटपट गेल्यानंतर संयमी खेळी केली. त्याने कोणताही धोका न पत्करताना खेळपट्टीचा चांगल्याप्रकारे अंदाज घेतला. जम बसल्यावर मात्र त्याने चौफेर फटकेबाजी करत जबरदस्त अर्धशतक झळकावले आणि चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयात मोलाचे योगदान दिले.रायुडू याआधी मुंबई इंडियन्स संघात होता. त्याने २०१० ते २०१७ या कालावधीत मुंबईकडूनच शानदार कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली. २०१८ सालापासून रायुडू चेन्नई संघाकडून ‘सुपर’ कामगिरी करत आहे. शनिवारी झालेल्या आयपीएलच्या सलामीच्या सामन्यातही त्याने ४८ चेंडूंत ७१ धावांची सुपर खेळी करत संघाला विजयी सुरुवात करुन दिली.
रायुडूचा वाढदिवस चेन्नई सुपरकिंग्जने दणक्यात साजरा केला. त्याच्यावर संघसहकाºयांसह इतर संघांच्या खेळाडूंनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये मुंबई इंडियन्स मागे राहिली नाही. मुंबई संघाने अंबाती रायुडूचा आपल्या संघाच्या जर्सीमधला फोटो अपलोड करुन त्याला शुभेच्छा दिल्या. रायुडू जेव्हा मुंबईकडून खेळत होता तेव्हाचा मुंबई इंडियन्सच्या जर्सीतला रायुडूचा फोटो अपलोड करुन मुंबई इंडियन्सने मेसेज केला की, ‘हॅप्पी बर्थ-डे, ‘अॅम-बॅटिंग’ रायुडू. मोठी खेळी खेळत रहा.’ त्याचवेळी मुंबईने कंसात लिहिले की, पण या मोठ्या खेळी आमच्याविरुद्ध नको करुस.’
मुंबई इंडियन्सच्या ट्वीटनंतर चाहत्यांनीही यावर लाईक्स आणि ट्वीट्सचा पाऊस पाडला. मुंबईने रायुडूला दिलेल्या या हटके शुभेच्छा सर्वांनाच आवडल्या.