पुणे : ‘सात वर्षांआधीची गोष्ट असावी. ऋतुराज त्यावेळी १६ वर्षांचा होता. वेंगसरकर क्रिकेट अकादमीत तो आमच्याकडे प्रशिक्षणाला यायचा. त्यावेळी मी त्याला सलामीला फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्याच्यासाठी यशस्वी ठरला.’ ऋतुराज गायकवाडचे कोच संदीप चव्हाण यांनी ऋतुराजच्या यशामागील कारण सांगितले. महाराष्ट्राचा ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू आहे. त्याच्या कामगिरीचे कौतुक कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेदेखील केले. ऋतुराजने सलग तीनवेळा अर्धशतके ठोकून सामनावीराचा किताब जिंकला. चव्हाण म्हणाले, ‘१६ वर्षांचा हा खेळाडू महाराष्ट्र संघातून मधल्या फळीत फलंदाजी करायचा. क्लब सामन्यात मी त्याला डावाचा प्रारंभ करण्याचा सल्ला दिला. यामुळे भविष्यात लाभ होईल, अशी खात्री दिली. स्थानिक मांडके चषक स्पर्धेत त्याने सिनिअर गटात डावाची सुरुवात करताना क्रमश: १०० आणि ९० धावा ठोकून माझा निर्णय योग्य ठरवला होता. राज्याचे प्रतिनिधित्व करताना सलामीला सुरुवातीला त्याला त्रास झाला मात्र त्याने स्वत:ला लायक बनवले. सध्या तो तज्ज्ञ सलामीवीर बनला आहे.’
ऋतुराज २००८-२००९ ला १२ व्यावर्षी आमच्या अकादमीत दाखल झाला. त्याचवेळी त्याच्यातील प्रतिभा मी ओळखली होती. सुरुवातीला त्याचे फलंदाजीचे तंत्र वेगळे होते. तथापि अंडर १४ आणि अंडर १९ गटात खेळणे सुरू केल्यापासून त्याच्यात आत्मविश्वास वाढल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
ऋतुराजचे बालपणचे दुसरे कोच मोहन जाधव म्हणाले, ‘आयपीएलसारखेच यश ऋतुराजने सिनियर स्तरावरदेखील मिळवले आहे. आमंत्रित स्पर्धेत चमक दाखवल्यामुळे महाराष्ट्राच्या ज्युनियर संघात त्याची निवड झाली होती. त्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य स्वत:मध्ये सुधार करण्याची धडपड हे आहे. स्वत:चा खेळ तो स्वत: चांगल्या प्रकारे समजून घेण्यास नेहमी तयार असतो. या दोन गुणांच्या बळावर ऋतुराज लवकरच दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत सहभागी होऊ शकेल, असा माझा ठाम विश्वास आहे.’
ऋतुराजमध्ये तरुण विराट दिसतो
‘चेन्नईचा अनुभवी फलंदाज फाफ डु-प्लेसिसने ऋतुराजमध्ये तरुणपणातल्या विराट कोहलीच भास होतो, असे वक्तव्य करीत त्याचे कौतुक केले. ऋतुराजमध्ये मला तरुणपणातल्या विराट कोहलीचा भास होतो. मला त्याची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तो लगेच दडपण घेत नाही, सामना करतो. कोणत्याही तरुण खेळाडूमध्ये तुम्ही अशा प्रकारचे गुण शोधत असता. यातून त्यांना पुढे संधी मिळेल की नाही हे ठरो,’ असे डुप्लेसिस म्हणाला.
Web Title: IPL 2020: Ruturaj Gaikwad became successful only because of playing in the opener, advice was given by coach Sandeep Chavan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.