इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी अवघे 15 दिवस शिल्लक असूनही वेळापत्रक जाहीर न झाल्यानं क्रिकेटचाहते नाखुश आहेत. त्यात चेन्नई सुपर किंग्सच्या दोन खेळाडूंसह 11 सदस्यांना कोरोना लागण झाल्यामुळे स्पर्धा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. सुरेश रैना आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनही वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानं चाहत्यांच्या चिंतेत भर पडली. आतापर्यंत 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार एवढेच सर्वांना माहित आहे.
त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे ती आयपीएलच्या वेळापत्रकाची. त्यात शुक्रवारी ते जाहीर केलं जाईल, असं भारतीय नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनं सांगितलं होतं. शुक्रवारचा शनिवार उजाडला, परंतू अजूनही वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. आता गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी नवीन तारीख जाहीर केली.
53 दिवसांच्या या स्पर्धेतील सायंकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील, तर डबल हेडरचे 10 सामने दुपारी 3.30 वाजल्यापासून सुरू होतील.
का होतोय विलंब?19 सप्टेंबरला सुरू होणाऱ्या आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा उशीरा होण्यामागं चेन्नई सुपर किंग्स कारण ठरले. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 11 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं बीसीसीआयनं आयपीएलचे वेळापत्रक होल्डवर टाकले. परिस्थिती न सुधारल्यास चेन्नईला सलामीचा सामना खेळण्याची संधी द्यायची की नाही यावर चर्चा सुरू होती. पण, शुक्रवारी चेन्नईच्या सर्व कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बीसीसीआयसमोरील चिंता दूर झाली.
चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी आयपीएल वेळापत्रक रविवारी जाहीर केले जाईल.