दुबई : मुंबई इंडियन्सविरुद्ध रविवारी रोमहर्षक सामन्यात पाच धावांचा बचाव करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सुपर ओव्हरमध्ये सहा यॉर्कर टाकू इच्छित होता, अशी माहिती किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने दिली. नियमित २० षटकात सामना बरोबरीत सुटला. यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने केवळ पाच धावा केल्या. शमीने मात्र शानदार मारा करीत या धावांचा बचाव करताच पुन्हा सुपर ओव्हर खेळविण्याची वेळ आली.
पंजाबने अखेर हा सामना जिंकला.७७ धावा ठोकणाºया राहुलने विजयाबद्दल आनंद व्यक्त केला मात्र अशा विजयांची सवय लागू नये, असेही आवर्जून सांगितले. ‘हे पहिल्यांदा घडलेले नाही, मात्र अशा विजयाची सवय लागायला नको. अखेर दोन गुण स्वीकारावे लागतील. खेळपट्टी मंद असल्याने पॉवर प्लेमध्ये धावा काढाव्या लागतील याची मला जाणीव होती. मी ख्रिस गेल आणि निकोलस पुरन यांच्यावर विश्वास ठेवतो. ख्रिस फलंदाजीला आल्याने माझे काम सोपे झाले,’असेही राहुलने सांगितले.
‘सुपर ओव्हरची कधीही तयारी करता येत नाही. कुठल्याही संघाला हे जमणार नाही. त्यासाठी योग्य गोलंदाजावर विश्वास ठेवावा लागतो. शमी सर्व सहा यॉर्कर टाकण्याच्या तयारीत होता. प्रत्येक सामन्यात तो उत्कृष्ट कामगिरी करतो. सिनियर खेळाडूने विजय साजरा करावा हे महत्त्वाचे आहे. ’- लोकेश राहुल