फाफ डूप्लेसिस (Faf duplesis) आणि शेन वॉटसन (Shane Watson) यांनी केलेल्या विक्रमी दीडशतकी सलामी भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने (Chennai Superkings) रविवारी किंग्ज ईलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) १० विकेट्सने धुव्वा उडवला. सलग तीन पराभव पत्करुन मैदानावर उतरलेल्या सीएसकेसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यात वॉटसनही फॉर्ममध्ये आला आणि त्याने फाफ डूप्लेसिससह संघाला जबरदस्त विजयी केले. यावेळी वॉटसनने ३ उत्तुंग षटकार ठोकले. यातील एक षटकार १००हून अधिक मीटरचा ठरला मात्र, यंदाचा सर्वात लांबचा षटकार मारण्यापासून तो केवळ ४ मीटरने दूर राहिला.
पंजाबने प्रथम फलंदाजी करत ४ बाद १७८ धावा उभारल्यानंतर चेन्नईने एकही बळी न गमावता केवळ १७.४ षटकांमध्येच १८१ धावा उभारत तुफानी विजय मिळवला. या विजयामुळे चेन्नई संघात जबरदस्त आत्मविश्वास संचारला. याआधी सलग तीन सामने गमावलेला चेन्नई संघ गुणतालिकेतही तळाला होता. मात्र पंजाबविरुद्धच्या विजयानंतर आता चेन्नईने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
अनुभवी फलंदाज शेन वॉटसन आतापर्यंतच्या सामन्यात आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याचे फॉर्ममध्ये येणे चेन्नईसाठी महत्त्वाचे होते. पंजाबविरुद्ध झालेही तसेच. सावध सुरुवातीनंतर वॉटसनने खेळपट्टीवर जम बसवण्यास भर दिला. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर मात्र त्याने फाफ डूप्लेसिससह चौफेर फटकेबाजी केली. ११ चौकार व ३ षटकारांचा पाऊस पाडताना त्याने शानदार फटकेबाजी केली.
या तीन षटकरांपैकी एक षटकार वॉटसनने तब्बल १०१ मीटर दूर टोलावला. या षटकाराने पंजाबच्या खेळाडूंचे खच्चीकरणच झाले. मात्र वॉटसनला राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरला मागे टाकण्यात केवळ ४ मीटरने अपयश आले. आर्चरने यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल १०५ मीटरचा षटकार ठोकला आहे. विशेष म्हणजे यंदा केवळ आर्चर आणि वॉटसन यांनीच १००हून अधिक मीटरचे षटकार मारले आहेत. तिसऱ्या स्थानी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर असून त्याने ९९ मीटरचा षटकार ठोकला आहे.
Web Title: IPL 2020: Shane Watson's record just 4 meters away
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.