मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) यंदा जबरदस्त कामगिरी करताना पहिल्यांदाच Indian Premier League (IPL 2020) च्या अंतिम फेरीत धडक मारली. संपूर्ण स्पर्धेत केवळ दिल्लीचा अपवाद वगळता प्रत्येक संघाने किमान एकदा अंतिम फेरी गाठली आहे. मात्र ही कसर यंदा दिल्लीने भरुन काढली. दिल्लीच्या या यशामध्ये अष्टपैलू मार्कस स्टोईनिसची (Marcus Stoinis) कामगिरी मोलाची ठरली. त्याने संघाच्या या वाटचालीचे श्रेय सांघिक कामगिरीला देतानाच संघातील अनुभवी खेळाडूला विशेष श्रेय दिले. हा अनुभवी खेळाडू म्हणजे गब्बर शिखर धवन (Shikhar Dhawan).यंदाच्या सत्रात धवन कमालीचा फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत एकूण ६०३ धावा फटकावतान पहिल्यांदाच आयपीएलच्या एका सत्रात ६०० धावांचा पल्ला पार केला. स्टोईनिसनेही आपल्या अष्टपैलू खेळाने दिल्लीला अंतिम फेरीत नेले. त्याने ३५२ धावांसह १२ बळी घेतले आहेत. दोघांच्या जोरावर दिल्लीने अनेक सामने सहज जिंकले. आता स्टोईनिसने संघाच्या यशाचे गुपितही सांगितले आहे.स्टोईनिसने धवनकडून मिळणारे मारदर्शन मोलाचे ठरत असल्याचे सांगताना म्हटले की, ‘भले धवन संघाचा कर्णधार नाही, पण एक मार्गदर्शक म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. शिवाय तो सातत्याने चांगला खेळत आहे. धवन अविश्वसनीय फलंदाज असून त्याने काही शानदार शतकेही ठोकली आहेत. त्याने आम्हाला सर्वांनाच मार्गदर्शन केले आहे.’स्टोईनिस पुढे म्हणाला की, ‘तो संघाच्या आत एक लीडर आहे. तो खेळाला चांगल्याप्रकारे समजतो. माझ्या कामगिरीमध्ये त्याचा फार मोठा वाटा आहे. त्याच्यासोबत खेळण्यास मिळत आहे, ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे.’