वानखेडे स्टेडियमने शनिवारी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गजांच्या फटकेबाजीचा अनुभव पुन्हा घेतला. तब्बत सात वर्षांनी मैदानावर उतरलेल्या क्रिकेटचा देव सचिनला पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरले होते. आता मुंबईच्या चाहत्यांना वेध लागलेत ते इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या मोसमाची.... मुंबई इंडियन्सला चिअर करण्यासाठी मुंबईकर सज्ज होत आहेत. २९ मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा उद्धाटनीय सामना वानखेडे स्टेडियमवर होण्याची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. त्यामुळे आयपीएलमधील दोन बलाढ्य संघांची चुरस चुकवण्याचा मूड कोणाचाच नाही. पण, ठाकरे सरकारच्या विचाराधीन असलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांच्या आनंदावर पाणी फिरू शकते.
आयपीएल 2020चा पहिला सामना वानखेडेवर होणार ही घोषणा झाल्यापासून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, आयपीएल पुढे ढकलायची की नाही याबाबत महाराष्ट्र सरकार विचार करत असल्याची माहिती, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावरून आयपीएल २०२०च्या जेतेपदाच्या शर्यतीचा श्रीगणेशा करणार आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स हैदराबादला सनरायझर्स हैदराबादचा सामना करण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर पुन्हा 5 एप्रिलला घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूशी मुकाबला करेल. त्यानंतर संघ किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स असे दोन अवे सामने खेळेल.
त्यानंतर घरच्या मैदानावर सलग दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्याशी होतील. आयपीएलची चार जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध परतीचा सामना खेळण्यासाठी चेपॉकला रवाना होणार आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या बर्थ डेला म्हणजेच 24 एप्रिलला हा सामना होणार आहे. 2012 आणि 2014च्या आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स 28 एप्रिलला मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर सामना करणार आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स 1 मे रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्सशी भिडतील. मुंबई आणि दिल्ली यांच्यात 6 मे रोजी परतीचा सामना होईल. सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 9 मे रोजी परतीचा सामना होईल.
राजेश टोपे म्हणाले,''मोठ्या संख्येनं लोकं जिथे जमतात तेथे कोरोना व्हायरससारख्या संक्रामक रोगचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. अशा स्पर्धा नंतरही आयोजित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आयपीएल पुढे ढकलावी की नाही, यावर चर्चा सुरू आहे.''
Web Title: IPL 2020 should be postponed in view of coronavirus outbreak is on, say Maharashtra Health Minister Rajesh Tope svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.