शारजाह - आयपीएलमध्ये रविवारी रात्री किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला गेलेला सामना सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. या लढतीत अनेक विक्रम नोंदवले गेले. या सामन्यात मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, संजू सॅमसन यांनी केलेली फलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या अनेक वर्षे स्मरणात राहील. मात्र या सर्वांमध्ये अविस्मरणीय ठरेल ती अखेरच्या षटकांमध्ये राहुल टेवटितायने केलेली विस्फोटक खेळी. चाचपडत सुरुवात केल्यावर राहुल टेवटिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला मात्र नंतर केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे तो अवघ्या काही क्षणात हीरो बनला. दरम्यान, सामन्यातील त्या निर्णयाक क्षणी आपल्या मनात नेमकं काय चाललं होतं. हे आता उघडपणे सांगितलं आहे.या लढतीत मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना टेवटियाने १८ व्या षटकात शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर पाच सणसणीत षटकार ठोकले होते. मात्र तत्पूर्वी टेवटिया चाचपडत खेळत होता. त्यामुळे पहिल्या २३ चेंडूंमध्ये त्याच्या खात्यात केवळ १७ धावा जमा झाल्या होत्या. मात्र पहिल्या २० चेंडूत निराशाजनक कामगिरी झाली असली तरी आपला आत्मविश्वास कायम होता. असे टेवटियाने सांगितले आहे.आपल्या या अविस्मरणीय खेळीबाबत प्रतिक्रिया देताना टेवटिया म्हणाला की, मी मोठे फटके खेळू शकतो, याची माझ्या संघाला कल्पना होती. तसेच माझा स्वत:वरही विश्वास होता. बॅटमधून एक चेंडू सीमापार जाण्याची वाट मी पाहत होतो. त्यातही एकाच षटकात पाच षटकार फटकावणे जबरदस्त होते. मी सुरुवातील लेगस्पिनरला मारण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर अन्य गोलंदाजाला लक्ष्य केले. ही खेळी मी कदीही विसरू शकत नाही.२२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला शेवटच्या तीन षटकांमध्ये ५१ धावांची गरज होती. त्यावेळी राहुल टेवटियाने कॉट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकांत पाच षटकार ठोकत सामन्याचे चित्र पालटवून टाकले. दरम्यान, सामना संपल्यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ म्हणाला की, हा विजय आमच्यासाठी खास असा आहे. टेवटियाने कॉट्रेलविरोधात केलेली खेळी अप्रतिम होती. आम्ही टेवटियाला ज्या प्रकारे नेट्समध्ये सराव करताना पाहिले होते. तसाच खेळ त्याने कॉट्रेलच्या षटकामध्ये केला. त्याने हिंमत दाखवली. त्याने टाइमआऊटदरम्यान मला सांगितले होते की, आम्ही अजूनही जिंकू शकतो.असा झाला होता टेवटियाचा राजस्थानच्या संघामध्ये समावेशराजस्थान रॉयल्सने गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला सर्वात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे दिल्ली कॅपिटल्सला दिला होता. त्यानंतर राजस्थानने रहाणेच्या बदल्यात दिल्लीकडून लेगस्पिनर मयांक मार्कंडेय आणि राहुल टेवटिया यांना आपल्या संघात घेतले होते. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने २०१८ च्या लिलावामध्ये टेवटियाला ३ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.