मुंबई - चेन्नई सुपरकिंग्जला (Chennai Superkings) बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) १० धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे सामन्यावर वर्चस्व मिळवूनही मोक्याच्यावेळी फलंदाजांनी कच खाल्ल्याने सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळेच त्यांना हा पराभव जिव्हारी लागला. मात्र त्यातही नेटिझन्स आणि चाहत्यांनी या पराभवाचा राग काढला तो केदार जाधववर (Kedar Jadhav). त्याने केलेल्या संथ खेळीमुळे चेन्नईने हातातला सामना गमावल्याची प्रतिक्रिया चाहते देत आहेत. मात्र, आता चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग पुढे आले असून त्यांनी केदार जाधवलारवींद्र जडेजाच्या आधी फलंदाजीला पाठविण्याचे कारण सांगितले आहे.कोलकाताच्या १६७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ १५७ धावांचीच मजल मारता आली. धावांचा पाठलाग करताना संघ काहीसा अडचणीत असताना केदार जाधव रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावोच्या आधी फलंदाजीला आलेला पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यात केदारला फटकेबाजी करण्यात अपयश आल्याने तो ट्रोल होत आहे. केदारने १२ चेंडूंत केवळ नाबाद ७ धावा केल्या, तर जडेजाने ८ चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या. त्यामुळेच अनेकांनी चेन्नईच्या पराभवासाठी केदारलाच जबाबदार धरले.सामना संपल्यानंतर चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंंग यांनी केदारला लवकर फलंदाजीला पाठविण्यामागची योजना सांगितली. ते म्हणाले, ‘आम्हाला वाटले केदार फिरकी गोलंदाजी चांगल्या प्रकारे खेळतो आणि या जोरावर तो धावा काढेल. अशावेळी जडेजा फिनिशरची भूमिका बजावेल. मात्र असे झाले नाही आणि आता आम्हाला अनेक गोष्टींबाबत खोलवर विचार करावा लागेल. ११ ते १४ षटकांदरम्यान केवळ १४ धावाच निघाल्या आणि येथूनच फलंदाजांनी सामना गमावला. त्यावेळी शेन वॉटसन किंवा अंबाती रायुडू बाद झाले नसते, तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता. वेगाने धावा काढण्यात आम्हाला यश आले नाही आणि सामन्यावरील आमची पकड निसटत गेली.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020 : ...म्हणून केदारला जडेजाच्या आधी फलंदाजीला पाठवलं; फ्लेमिंगने स्पष्ट केली भूमिका
IPL 2020 : ...म्हणून केदारला जडेजाच्या आधी फलंदाजीला पाठवलं; फ्लेमिंगने स्पष्ट केली भूमिका
Kedar Jadhav News : सामन्यावर वर्चस्व मिळवूनही मोक्याच्यावेळी फलंदाजांनी कच खाल्ल्याने सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळेच त्यांना हा पराभव जिव्हारी लागला. मात्र त्यातही नेटिझन्स आणि चाहत्यांनी या पराभवाचा राग काढला तो केदार जाधववर.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 5:40 PM