मुंबई : सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी झालेल्या अत्यंत निर्णायक सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का देत यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफ प्रवेश निश्चित केला. प्ले ऑफ प्रवेश करण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. जर त्यांचा पराभव झाला असता, तर कोलकाता नाईट रायडर्सचा प्ले ऑफ प्रवेश झाला असता. मात्र एकतर्फी झालेल्या या सामन्यात हैदराबादने मुंबईला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. या धमाकेदार विजयासह हैदराबादने सलग पाचव्यांदा प्ले ऑफ फेरी गाठली असून अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा संघ ठरला आहे.
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि रिद्धिमान साहा यांनी दिलेल्या नाबाद १५१ धावांच्या दमदार सलामीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादनेमुंबई इंडियन्सचा १० गड्यांनी पराभव केला. हैदराबादने मुंबईला ८ बाद १४९ धावांवर रोखल्यानंतर १७.१ षटकांतच एकही बळी न गमावता १५१ धावा केल्या. वॉर्नर व साहा यांनी पहिल्या षटकापासून आपले इरादे स्पष्ट करत चौफेर फटकेबाजी केली. त्यांच्यापुढे हतबल झालेल्या मुंबईला जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांची कमतरता भासली. वॉर्नरने ५८ चेंडूंत नाबाद ८५, तर साहाने ४५ चेंडूंत नाबाद ५८ धावा फटकावल्या.
यासह हैदरबादने सलग पाचव्यांदा प्ले ऑफ फेरी गाठताना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या पराक्रमाची बरोबरी केली. २०१६ साली विजेतेपद पटकावल्यानंतर हैदराबादने स्पर्धेत सातत्य राखले आहे. हैदराबादने २०१६, २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० अशी सलग पाच वर्षे प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे.
हैदराबादच्याआधी असा पराक्रम केवळ सीएसके आणि मुंबईनेच केला होता. चेन्नईने आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून ते २०१५ सालापर्यंत सलग ८ वर्षे प्ले ऑफमध्ये धडक मारली. मात्र यंदा सीएसकेला स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आलेला नाही. दुसरीकडे, मुंबईनेही जबरदस्त सातत्य राखताना २०१० ते २०१५ अशी सलग ६ वर्षे प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे.