दुबई - आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमने-सामने येत आहेत. दरम्यान, आज होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आजच्या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे दिल्लीच्या संघात कर्णधार श्रेसय अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे यांच्यानंतर अजून एका मुंबईकर खेळाडूला स्थान मिळाले आहे. मुंबईकर क्रिकेटपटू तुषार देशपांडे आजच्या लढतीमधून दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.२५ वर्षीय तुषार देशपांडेने आतापर्यंत २० प्रथमश्रेणी सामने खेळले असून, त्यात त्याने ५० बळी टिपले आहेत. तर २० ट्वेंटी-२० सामन्यांत ३१ बळी टिपले आहेत. तसेच तुषार देशपांडेने फलंदाजीमध्येही कमाल दाखवली आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. सात सामन्यांमध्ये पाच विजय आणि दहा गुणांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या मागच्या लढतीत दिल्लीला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या लढतीत विजय मिळवून पुन्हा एकदा विजयपथावर परतण्याचे आव्हान दिल्लीसमोर आहे.