मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या लिलावाला काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. पण यापूर्वीच यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात महागडे कोणते चार खेळाडू असणार आहे, हे समजले आहे. या चार खेळाडूंमध्ये तीन कर्णधार असले तरी चौथा खेळाडू मात्र सध्याच्या घडीला फॉर्मात नाही.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस लीन यांना इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी होणाऱ्या लिलावात सर्वाधिक मुळ किमतीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. आयपीएल 2020 साठीचे ट्रेंड विंडो बंद झाल्यानंतर लिलावासाठी अर्ज करणाऱ्या खेळाडूंना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आयपीएलनं सोमवारी लिलावासाठी उपलब्ध असलेल्या 971 खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यानुसार आयपीएलनं खेळाडूंची विभागणी करून त्यांची मुळ किंमत ठरवली आहे. त्यानुसार मॅक्सवेल आणि लीन यांच्यासह सात खेळाडूंना 2 कोटी मुळ किमतीच्या विभागात ठेवण्यात आले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळणार आहे ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला. कोहलीला आरसीबीचा संघ १७ कोटी रुपये देणार आहे. कोहलीनंतरच्या तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी १५ कोटी रुपये मिळणार आहेत. हे तीन खेळाडू आहेत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, चेन्नई सपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंत.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्कसह इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांनी आयपीएलच्या पुढील मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याच मान स्टार्कनं पटकावला होता. शिवाय पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही त्याच्या भेदक माऱ्यानं प्रतिस्पर्धी हतबल झालेले पाहायला मिळत आहेत. स्टार्क 2015च्या आयपीएल हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला होता. त्यानंतर त्याला कोलकाता नाइट रायडर्सनं 9.4 कोटीत आपल्या चमूत दाखल करून घेतलं, परंतु दुखापतीमुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही. त्यानंतर त्यानं दुखापतीतून सावरण्यासाठी आयपीएलमधून माघार घेतली होती. शिवाय 2019चा वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून तो आयपीएल खेळलाच नाही.
कोणीची किती मुळ किंमत
2 कोटीः पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), जोश हेझलवूड ( ऑस्ट्रेलिया), ख्रिस लीन ( ऑस्ट्रेलिया), मिचल मार्श ( ऑस्ट्रेलिया), ग्लेन मॅक्सवेल ( ऑस्ट्रेलिया), डेल स्टेन ( दक्षिण आफ्रिका), अँजेलो मॅथ्यूज ( श्रीलंका).1.5 कोटीः रॉबीन उथप्पा ( भारत), शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया), केन रिचर्डसन ( ऑस्ट्रेलिया), इयॉन मॉर्गन ( इंग्लंड), जेसन रॉय ( इंग्लंड), ख्रिस वोक्स ( इंग्लंड), डेव्हिड विली (इंग्लंड), ख्रिस मॉरिस ( दक्षिण आफ्रिका), कायले अबॉट ( दक्षिण आफ्रिका).