Indian Premier League ( IPL 2020) चा 13वा पर्व सुरू होऊन 15 दिवस पूर्ण झाली आहेत. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore), राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals), किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) या संघांच्या खेळाडूंनी अविस्मरणीय खेळी करून चाहत्यांना सुखावले. संजू सॅमसन, देवदत्त पडीक्कल, राहुल टेवाटिया, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ यांच्या लाजवाब खेळीनं चाहते मंत्रमुग्ध झाले. वरिष्ठ खेळाडूंमध्ये रोहित शर्मा वगळता आणखी कोणाची बॅट तळपलेली नाही. या स्टार्ससाठी फ्रँचायझींनी कोट्यवधी रक्कम मोजली आहे. पण, IPL 2020च्या पंधरा दिवसांत पाच खेळाडूंनी मिळालेल्या पैशांचं मोल जपलं आहे.
देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) - RCB च्या 20 वर्षीय खेळाडूंनं आक्रमक फटकेबाजीनं सर्वांचे लक्ष वेधले. पाच सामन्यांत त्यानं 35.60च्या सरासरीनं 178 धावा केल्या आहेत. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पैशांचे आणि त्याच्या कामगिरीचे मोल ठरवल्यास तो अव्वल स्थानावर येतो. त्याला 20 लाखांच्या बोलीत RCBनं आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. त्याचे Impact Points हे 183 होतात आणि त्यानुसार प्रत्येक गुणांची किंमत ही 10,928.96 इतकी होते.
मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) - IPL 2020च्या ऑरेंज कॅप शर्यतीत किंग्स इलेव्हन पंजाबचा हा खेळाडू तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 5 सामन्यांत 162.87च्या स्ट्राईक रेटनं 272 धावा कुटल्या आहेत. त्यात एक शतक व 1 अर्धशतकाचा समावेश आहे. पैशांचा मोल मोजल्यास तो दुसऱ्या स्थानावर येतो. यंदाच्या IPLमध्ये त्याला 1 कोटी मिळणार आहेत आणि त्याचे Impact Points 281 इतके असून प्रत्येक गुणाची किंमत ही 35,587.19 इतकी होते.
अब्दुल समद ( Abdul Samad) - जम्मू-काश्मीरच्या या 18 वर्षीय फलंदाजांनं सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना तीन सामन्यांत 40 धावा व एक विकेट घेतली आहे. या क्रमवरीत तो तिसऱ्या क्रमांकावर येतो आणि त्याला 20 लाखांत SRHने ताफ्यात घेतले आहे. त्याचे Impact Points हे 56 असून प्रत्येक गुणाची किंमत ही 35,714.29 इतकी होते.
महिपाल लोम्रोर ( Mahipal Lomror) - राजस्थान रॉयल्सच्या या अष्टपैलू खेळाडूनं एका सामन्यात 47 धावा कुटल्या, त्यात 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. तो चौथ्या क्रमांकावर येतो आणि त्यालाही 20 लाखांत RRने ताफ्यात घेतले आहे. 47 Impact Point नुसार त्याच्या प्रत्येक गुणाची किंमत ही 42,553.19 इतकी होते.
मुरुगन अश्निव ( Murugan Ashwin) - 30 वर्षीय खेळाडूनं किंग्स इलेव्हन पंजाबकडून दोन सामन्यांत चार विकेट्स घेतल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर असलेला हा खेळाडू 20 लाखांत KXIPच्या ताफ्यात दाखल झाला. 40 Impact Point नुसार त्याच्या प्रत्येक गुणाची किंमत 50 हजार इतकी आहे.