मुंबई : आयपीएलच्या १३ व्या पर्वात पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने बुधवारी दिल्लीच्या विजयात चमकदार कामगिरी केली. कल्याण ते दुबई व्हाया मुंबई असा प्रवास करणाऱ्या तुषारला हर्षल पटेलऐवजी राजस्थानविरुद्ध संधी दिली.
तुषारनेही संधीचे सोने करताना बेन स्टोक्सचा महत्त्वाचा बळी घेत यश मिळवून दिले. २५ वर्षांच्या या गोलंदाजाने ३७ धावात दोन गडी बाद करत १३ धावांनी विजय मिळवून दिला. करिअरच्या सुरुवातीला शिवाजी पार्कवर फलंदाज बनण्यासाठी गेलेल्या तुषारने फलंदाजांची लांबच लांब रांग पाहून इरादा बदलला. त्याला स्वत:च्या निर्णयाचा गर्व वाटतो. तो म्हणाला,‘ २००७ ला कल्याणहून शिवाजी पार्कला ३-४ मुलांसोबत फलंदाज बनायला गेलो होतो. तेथे ४०-४५ जण रांगेत होते. त्यातील किमान २५ जणांनी पॅड बांधले असावेत. गोलंदाजांच्या रांगेत केवळ १५-२० जण होते. दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत निवड होणार होती. मला संधी मिळणार नाही, असे वाटले आणि गोलंदाजांच्या रांगेत उभा राहिलो.’‘साधारण गोलंदाजांच्या तुलनेत मी अधिक वेगवान मारा करतो, हे कुणीही ध्यानात आणून दिले नाही. मला नवा चेंडू मिळताच रन अप निश्चित करुन चेंडू टाकायला सुरुवात केली. पद्माकर शिवलकर यांनी‘ फार छान चेंडू टाकलास, पुन्हा एकदा टाक,’ या शब्दात प्रोत्साहन दिले. सहा-सात चेंडूनंतर माझी निवड करण्यात आली. संदेश कावळे सरांनी मला हिंमत दिली.श्रेयस अय्यर माझ्यासोबतच त्यावेळी शिवाजी पार्कवर सराव करायचा.’