चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) बुधवारी मोठा धक्का बसला. त्यांच्या संघातील सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo ) यानं दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे आता CSKसमोरील अडचणी अधिक वाढल्या आहेत. यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League) चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) काही चांगली राहिली नाही. आयपीएलच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) या संघावर प्ले ऑफमधून बाहेर फेकले जाण्याचे संकट ओढावले आहे. १० सामन्यांत त्यांना ७ पराभव पत्करावे लागले आहेत.
IPL 2020ला सुरुवात होण्यापासून त्यांच्यामागे लागलेलं संकट त्यांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. सुरेश रैना व हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर CSKची स्पर्धेतील कामगिरी कशी झाली, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. फॅफ ड्यू प्लेसिस वगळता त्यांच्या अन्य कोणत्याच खेळाडूला सातत्य राखता आले नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होनं मांडीचा सांधा दुखावल्यामुळे मैदान सोडले होते. सामन्यानंतर धोनीनंही तो दुखापतग्रस्त झाल्याचे सांगितले. त्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण, आता ब्राव्होनं माघार घेतल्याचे वृत्त आहे. ''ब्राव्हो आता या स्पर्धेत पुढे खेळू शकणार नाही. मांडीचा सांधा दुखावल्यामुळे त्यानं माघार घेतली आहे. तो येत्या दोन दिवसांत मायदेशात परतणार आहे,''असे CSKचे CEO कासी विश्वनाथन यांनी सांगितले.
कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) त्याला दुखापत झाली होती आणि त्याला काही सामन्यांना मुकावे लागले होते. त्यानंतर तो आयपीएलसाठी दुबईत दाखल झाला. यंदाच्या मोसमात ब्राव्होला आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. त्यानं ६ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. ''सुरेश रैना आणि हरभजन सिंग हे संघाचे प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यांची उणीव प्रकर्षानं जाणवली. पण, त्यांच्या वैयक्तिक निर्णयाचा आपल्याला आदर करायला हवा,''असेही विश्वनाथन यांनी सांगितले.
यूएई सोडण्यापूर्वी ब्राव्होनं संघासाठी व चाहत्यांसाठी एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यानं म्हटलं की,''हे अत्यंत वाईट आहे. चेन्नई सुपर किंग्सला सोडून जाताना दुःख होत आहे. मी सर्व चाहत्यांना विनंती करतो की CSKच्या मागे खंबीरपणे उभे राहा... त्यांना प्रोत्साहन देत राहा. या मोसमात आम्हाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, परंतु आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही काहीवेळा आम्हाला त्याचे विजयात रुपांतर करता आले नाही.''