मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Banglore) यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) धील सर्वात धमाकेदार विजय मिळवताना बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) ८ गड्यांनी लोळवले. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर केकेआरला केवळ ८४ धावाच करता आल्या. यानंतर दोन फलंदाजांच्या मोबदल्यात आरसीबीने शानदार विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटला. त्याचवेळी, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही नाणेफेक आम्ही गमावली ते बरंच झालं, अशी प्रतिक्रिया दिली.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला फार कष्ट पडले नाही. देवदत्त पडिक्कल-अॅरोन फिंच यांनी ४६ धावांची सलामी देत केकेआरचे मानसिक खच्चीकरण केले. त्याआधी, सिराजने केकेआरच्या फलंदाजीला सुरुंग लावत ४ षटकांत केवळ ८ धावा देत तीन खंदे फलंदाज बाद केले. सिराजने डावातील दुसºया व आपल्या पहिल्याच षटकात राहुल त्रिपाठी, नितिश राणा यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले आणि येथूनच केकेआरच्या फलंदाजीला खिंडार पडले. कर्णधार इयॉन मॉर्गनचा अपवाद वगळता कोणालाही फारवेळ तग धरता आला नाही. त्याने ३४ चेंडूंत ३० धावांची खेळी केली.
या सामन्यानंतर कोहलीने सांगितले की, ‘वॉशिंग्टन सुंदरला नवा चेंडू देण्याचा माझा विचार होता. आम्ही नाणेफेक गमावली ते चांगलंच झालं, कारण आम्हीदेखील प्रथम फलंदाजीचाच निर्णय घेतला असता. सुंदर आणि ख्रिस मॉरिससह नव्या चेंडूंने सुरुवात करण्याची आमची योजना होती. मात्र त्यावेळी आम्ही मॉरिस आणि सिराज यांच्याकडे नवा चेंडू सोपविण्याचा निर्णय घेतला.’
संघाच्या रणनितीविषयी कोहली म्हणाला की, ‘आमच्या संघ व्यवस्थापनाने एक पाया रचला आहे, ज्यात अचूक योजना आखली जाते. आमच्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी अशा योजना तयार असतात. या योजनांनुसार कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. लिलाव प्रक्रियेतही आम्ही काही गोष्टींचा प्रयोग केला होता आणि त्याचा फायदा आता होत आहे. तुमच्याकडे अनेक योजना असतात, पण सर्वात महत्त्वाचे तुमचा तुमच्या खेळाडूंवर विश्वास असायला हवा.’