- ललित झांबरे
श्रेयस अय्यर हा मूळचा मुंबईचाच. पण मंगळवारी आपल्याच मुंबईला हरविण्यासाठी तो प्रयत्नांची शिकस्त करेल आणि तसे करुन दिल्ली कॕपिटल्सला पहिल्यांदा विजेता बनविण्यात तो यशस्वी ठरला तर तो मुंबईचाच कर्णधार रोहित शर्मा याचा विक्रम मोडेल. आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा तो सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरेल.
श्रेयसची जन्मतारीख 6 डिसेंबर 1994 असून मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुध्द ते अंतिम सामना खेळतील तेंव्हा त्याचे वय 25 वर्ष 339 दिवस असेल.
मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएल जिंकले होते त्यावेळी रोहित शर्मा कर्णधार होता. 26 मे 2013 रोजी कोलकाता येथे चेन्नई सुपर किंग्जला मात देत मुंबईचा संघ विजेता ठरला होता त्यावेळी रोहित शर्माचे वय 26 वर्ष 26 दिवस होते. आता श्रेयस जवळपास दोन महिन्यांच्या अंतराने त्याचा हा विक्रम मोडेल.
आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि या यशासह आधीच श्रेयसने दिल्लीसाठी इतिहास घडवला आहे. शिवाय एलिमिनेटरच्या मार्गाने विजेतेपद पटकावणारा सनरायजर्सनंतरचा पहिला संघ ठरण्याच्या ते प्रयत्नात आहेत. सनरायजर्सने 2016 मध्ये एलिमिनेटरच्या मार्गाने विजेतेपद पटकावले होते.