- ललित झांबरे
दिल्ली कॕपिटल्सच्या (Delhi Capitals) शिखर धवनने (Shikhar Dhawan) किंग्ज इलेव्हनविरुध्द (Kings XI Punjab) नाबाद 106 धावांची खेळी केली. दिल्लीने सामना गमावला पण त्यांच्या 164 धावांपैकी एकट्या शिखरच्या धावा होत्या 106. म्हणजे इतरांनी धावा केल्या फक्त 58. याप्रकारे आयपीएलमध्ये संघाच्या धावसंख्येत सर्वाधिक योगदान असणारी ही शतकी खेळी ठरली आणि त्यासाठी धोनी सामनावीर (POM) ठरला.
पराभवात शतकी खेळी आणि सामनावीर असा आयपीएलच्या इतिहासातील तो केवळ तिसरा खेळाडू ठरला. योगायोगाने ही तिन्ही खेळाडू भारतीय आहेत. युसुफ पठाण (Yusuf Pathan) , विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवन. मार्च 2010 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी युसुफ पठाण असा पहिला सामनावीर ठरला होता. मुंबई इंडियन्सविरुध्द त्याने 37 चेंडूतच 100 धावांची वादळी खेळी केली होती पण तरी त्याचा संघ तो सामना हरला होता.
एप्रिल 2016 मध्ये रॉयल चॕलेंजर्सच्या विराट कोहलीबाबत असेच घडले. गुजराथ लायन्सविरुध्द राजकोट येथे त्याने 63 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या पण त्याचा संघ सामना जिंकू शकला नव्हता. आणि आता शिखर धवनने 61 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या पण दिल्ली कॕपिटल्सच्या संघाला किंग्ज इलेव्हनकडून पराभव पत्करावा लागला. यापैकी युसुफचे शतक हे पाठलागातले होते तर धवन व विराटने प्रथम फलंदाजी करताना शतक केले होते. विराटचे हे पहिलेच आयपीएल शतक होते.