तब्बल 13 वर्ष, 168 सामने, 167 डाव आणि 39 अर्धशतके केल्यानंतरही शिखर 'गब्बर' धवनच्या (Shikhar Dhawan) नावावर आयपीएलमध्ये (IPL) एकही शतक नव्हते. 264 डाव खेळला तरी तो टी-20 क्रिकेटमध्ये तीन आकडी धावांची खेळी करु शकलेला नव्हता पण ह्याच गब्बरने आता टी-20 सामन्यांच्या लागोपाठ दोन डावात दिल्ली कॕपिटल्ससाठी (DC) दोन शतकं झळकावली आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुध्द (CSK) नाबाद 101 धावा केल्यावर मंगळवारी त्याने किंग्ज इलेव्हनविरुध्द नाबाद (KXIP) 106 धावा केल्या.
याप्रकारे आयपीएलमध्ये लागोपाठ दोन डावात दोन शतकं करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. मात्र टी-20 सामन्यांमध्ये अशी लागोपाठ शतकं करणारा तो पहिलाच फलंदाज नाही. त्याच्याआधी आठ फलंदाजांनी अशी लागोपाठ दोन टी-20 शतकं झळकावली आहेत. त्यात डेव्हीड वाॕर्नर, उन्मुक्त चंद, ल्युक राईट, मायकेल क्लिंजर, केव्हिन पीटरसन, मार्को मरायस, रिझा हेंड्रीक्स व इशान किशन यांचा समावेश आहे. ही यादी जर पाहिली तर त्यात उन्मुक्त चंद व इशान किशन हे दोन भारतीय फलंदाज दिसतात. म्हणजे गब्बरच्या आधी या दोघांनी लागोपाठ दोन टी-20 शतकं केली आहेत. पण या दोघांची शतके राष्ट्रीय स्तरावरील सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील होती.
उन्मुक्त चंदने मार्च 2013 मध्ये दिल्लीसाठी गुजरातविरुध्द 63 चेंडूत 125 धावा केल्या होत्या. त्याच्याआधी केरळविरुध्द त्याने 67 चेंडूत 105 !धावांची खेळी केली होती. याप्रकारे डेव्हिड वाॕर्नरनंतर लागोपाठ दोन टी-20 शतकं झळकावणारा उन्मुक्त हा पहिलाच होता. झारखंडच्या इशान किशनने फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मु आणि काश्मिरविरुध्द 55 चेंडूत 100 धावा केल्यावर मणीपूरविरुध्द 62 चेंडूत 113 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर आता गब्बरने आयपीएलमध्ये नाबाद 101 व नाबाद 106 धावांच्या खेळी केल्या आहेत. याआधी 2016 च्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने तीन डावात दोन शतकं केली होती.