इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. या लिलावात एकूण 971 खेळाडूंवर बोली लागणार आहे आणि त्यांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सर्वाधिक 2 कोटी मुळ किंमत असलेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्यात ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस लीन यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, या यादीत युवराज सिंगचं नाव कुठेही दिसले नाही. मुंबई इंडियन्सनं त्याला रिलीज केले आहे. त्यामुळे युवराज आयपीएल 2020मध्ये खेळणार नसल्याची चर्चा रंगत आहे.
आयपीएल 2019साठीच्या लिलावात मुंबई इंडियन्सनं युवराजला मुळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. लिलावात युवीवर कोणीच बोली लावली नव्हती, परंतु अखेरच्या राऊंडमध्ये मुंबई इंडियन्सनं त्याला संघात सहभागी करून घेतले. 2019च्या मोसमात युवीला मुंबई इंडियन्सनं चार सामन्यात खेळण्याची संधी दिली. त्यात युवीनं एक अर्धशतकी ( 53) खेळीसह 98 धावा केल्या.
आयपीएल 2020च्या लिलावात युवी दिसणार नाही. कारण युवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते. त्यांतर त्यानं ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये टोरोंटो नॅशनल संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तो टी 10 लीगमध्ये मराठा अरेबियन्स संघाकडूनही खेळला. बीसीसीआयच्या नियमानुसार निवृत्त क्रिकेटपटूला परदेशातील लीगमध्ये खेळण्याची बीसीसीआय परवानगी देते. त्यामुळेच युवीला आता आयपीएलमध्येही खेळता येणार नाही. युवराजनं जून 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. त्यानं निवृत्ती जाहीर करताना 2019ची आयपीएल स्पर्धा ही आपली शेवटची स्पर्धा असल्याचं जाहीर केलं होतं.
- 971 खेळाडू ( 713 भारतीय आणि 258 परदेशी)
- 73 खेळाडूंची जागा उपलब्ध
- 215 आंतरराष्ट्रीय खेळाडू, 754 स्थानिक खेळाडू आणि 2 संलग्न देशांतील खेळाडू