मुंबई : Indian Premier League (IPL 2020)मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्ज ईलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) पुन्हा एकदा विजयी मार्ग पकडताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challeners Banglore) ८ गड्यांनी पराभव केला. पंजाबचा विजय वाटतो तितका मोठा असला, तरी त्यांना या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले. अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना निकोलस पूरनने (Nicholas Pooran) युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) पुढे सरसावत षटकार ठोकला आणि पंजाबचा विजय साकारला. परंतु हा सामना रंगतदार केला तो चहलनेच. यासह त्याने सामन्यात एक बळी घेत टी-२० क्रिकेटमध्ये बळींचे द्विशतकही पूर्ण केले.
आरसीबीच्या १७१ धावांचा पाठलाग करताना १९व्या षटकापर्यंत पंजाबने वर्चस्व राखले. अखेरच्या षटकात पंजाबला केवळ २ धावांची गरज होती. मात्र या षटकात चहलने आरसीबीला अक्षरश: नाचवले. याशिवाय गेल धावबादही झाला. अखेर एक चेंडू एक धाव असे समीकरण असताना निकोलस पूरनने पुढे सरसावत चहलला षटकार ठोकत पंजाबच्या विजयावर शिक्का मारला.
चहलने या सामन्यात तीन षटकांत ३५ धावा देत एक बळी घेतला. त्याने मयांक अगरवालला त्रिफळाचीत केले. मयांकच्या रुपाने चहलने टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळी पूर्ण करण्याचा पराक्रम केला. चहलच्या आधी अशी कामगिरी भारताच्या चार गोलंदाजांनी केली आहे. विशेष म्हणजे टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळी पर्ण करणाºयांमध्ये एकही वेगवान गोलंदाज नाही. या यादीमध्ये चेन्नईकडून खेळणार पियूष चावला सर्वात आघाडीवर असून त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एकूण २५७ बळी पूर्ण केले आहेत. याशिवाय अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन आणि हरभजन सिंग यांनीही २०० बळी पूर्ण केले आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारे भारतीय गोलंदाज :
१. पीयूष चावला : २५७ बळी.
२. अमित मिश्रा : २५६ बळी.
३. रविचंद्रन अश्विन : २४२ बळी.
४. हरभजन सिंग : २३५ बळी.
५. युझवेंद्र चहल : २०० बळी.
Web Title: IPL 2020 Yuzvendra Chahal Becomes Fifth Indian Bowler To Claim 200 T20 Wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.