इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. १८ फेब्रुवारीला आयपीएल २०२१साठी मिनी ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी ८ फ्रँचायझींनी १३९ खेळाडूंना कायम ठेवले, तर ५७ खेळाडूंना रिलीज केले आहे. आता प्रत्येक संघ ऑक्शनची रणनीती आखत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्सही ( Mumbai Indians) मागे नाही. लसिथ मलिंगानं ( Lasith Malinga) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे MIनं त्याला रिलीज केले. त्याशिवाय मुंबई इंडियन्सनं लसिथ मलिंगासह नाथन कुल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅक्लेनघन, प्रिंस बलवंत सिंह, दिग्विजय देशमुख यांनाही रिलीज केले आहे. त्यांच्या पर्समध्ये १५.३५ कोटी शिल्लक आहेत आणि त्यात त्यांना ३ भारतीय व ४ परदेशी खेळाडूंची रिक्त जागा भरायची आहे.
मुंबई इंडियन्सनं आयपीएलची सर्वाधिक पाच जेतेपद जिंकली आहेत. २०२१साठीही जेतेपदाच्या निर्धारानं ते मैदानावर उतरणार आहेत. त्यादिशेनं मुंबई इंडियन्स रणनीती आखत आहे. रोहित शर्माच्या संघानं नागालँडच्या १६ वर्षीय गोलंदाज ख्रिएवीत्सो केन्से ( Khrievitso Kense ) याला ट्रायलसाठी मुंबईला बोलावले आहे. नागालँडच्या पहिल्याच खेळाडूला आयपीएल फ्रँचायझीनं ट्रायलसाठी बोलावलं आहे. १६ वर्षीय लेग स्पिनर केन्सेनं सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ( Syed Mushtaq Ali Trophy 2020-21) स्पर्धेतील कामगिरीनं मुंबई इंडियन्सचं लक्ष वेधलं.