आयपीएलच्या (IPL 2021) १४ मोसमाची रंगत आता वाढू लागली आहे. कोरोनाच्या संकट काळात क्रिकेट प्रेमींचं मनोरंजन करण्यासाठी आयपीएलचे संघ देखील सज्ज आहेत. खेळाडूंनी नेट्समध्ये घाम गाळण्यासही सुरुवात केलीय. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्सच्या (AB de Villiers) फलंदाजीची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. डीव्हिलियर्स सध्या नेट्समध्ये जोरदार सराव करतोय.
आयपीएलसाठी मोठे फटके खेळण्याचा सराव डीव्हिलियर्स करतोय. डीव्हिलियर्सच्या भात्यात टी-२० सारख्या झटपट क्रिकेटसाठी लागणारे सर्व हटके फटके आहेत. त्याचाच सराव करत असताना डीव्हिलियर्सला आपला आयफोन गमवावा लागलाय. डीव्हिलियर्स नेट्समध्ये फलंदाजी करत असताना त्याचं आपल्या आयफोनमध्ये व्हिडिओ चित्रिकरण करत होता. पण त्यानं लगावल्या फटक्यानंतर चेंडू थेट त्याच्या फोनवर येऊन आदळला आणि फोन खाली पडला. (IPL 2021: AB de Villiers smashes his iPhone out of shape during practice)
डीव्हिलियर्सच्या बॅटमधून निघालेला फटका इतका जोरदार होता की आयफोन फुटला. डीव्हिलियर्सनं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत 'आयफोन आऊट' असं कॅप्शन दिलंय.
'मिस्टर ३६० डिग्री' अशी डीव्हिलियर्सची ओळख आहे. मैदानाच्या चहुबाजुंना फटके लगावण्याची क्षमता तो ठेवतो याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळेच डीव्हिलियर्स बंगळुरू संघाचा हुकमाचा एक्का समजला जातो. डीव्हिलियर्सची बॅट पुन्हा एकदा तळपणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात डीव्हिलियर्ससह ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सेवलचाही समावेश झाला आहे. त्यामुळे संघाची मधली फळी भक्कम झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे डीव्हिलियर्स आणि मॅक्सवेलची चौकार, षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहते उत्सुक असणार आहेत.