IPL 2021: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ यंदा जोरदार फॉर्मात आहे. दिल्लीचा संघ यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. १३ पैकी १० सामन्यांमध्ये विजय प्राप्त करत संघानं २० गुणांसह अव्वल स्थान काबीज केलं आहे. पण फक्त स्पर्धेतच नव्हे, तर नेट्समध्ये सरावावेळीही संघाचे खेळाडू एक नंबर कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा असाच अनुभवी आणि मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ संघाकडून पोस्ट करण्यात आला आहे. यात अजिंक्य रहाणेनं एक अनोखी हट्ट्रीक आपल्या नावे केली आहे. अजिंक्यच्या हॅट्ट्रीकवर संपूर्ण संघातील खेळाडू तुफान जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत.
प्ले-ऑफमध्ये दाखल झालेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे खेळाडू नेट्समध्ये 'डायरेक्ट थ्रो'चा सराव करत होते. यात अजिंक्य राहणेनंही सहभाग घेतला होता. रहाणेनं त्याला मिळालेल्या तिनही संधींमध्ये अचून निशाणा साधला आणि एकच जल्लोष सुरू झाला. अजिंक्यचा अचूक निशाणा पाहून संघातील खेळाडू देखील हैराण झाले. सराव शिबिरातील हा धमाल व्हिडिओ अजिंक्यनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
रहाणे सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एकभारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये अजिंक्य रहाणेचाही समावेश होतो. मग ते कसोटी क्रिकेटमध्ये स्लिपमध्ये फिल्डिंग करणं असो किंवा मग वन-डेमध्ये शॉर्ट लेग आणि पॉइंटवर फिल्डिंग करणं असो, अजिंक्यला आपण आजवर अनेकदा अप्रतिम झेल टिपताना पाहिलं आहे. तसंच अनेकदा अचूक निशाणा साधत प्रतिस्पर्धी फलंदाजाला धावचीत करतानाचीही अनेक उदाहरणं आहेत.
आयपीएलच्या यंदाच्या सीझनला मिळेना संधी!आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये अजिंक्य रहाणेला संघात खेळण्याची जास्त संधी मिळालेली नाही. रहाणेनं यंदाच्या सीझनमध्ये केवळ दोन सामने खेळले आहेत आणि त्यात फक्त आठ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघात येण्याआधी अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. यात अजिंक्य रहाणेनं राजस्थानच्या नेतृत्त्वाचीही धुरा सांभाळली होती. रहाणेनं आपल्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत खेळलेल्या १५१ सामन्यांमध्ये ३९४१ धावा केल्या आहेत. तर दोनं शतकं देखील ठोकलं आहे. १०५ ही रहाणेची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या राहिली आहे. तर २८ अर्धशतकांचा समावेश आहे.