मुंबई : देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आयपीएलमधून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्स संघाला बसला आहे. त्यामुळेच त्यांनी आता इतर संघांकडून काही खेळाडू उधारीवर म्हणजे लोनवर घेण्याचे ठरविले आहे. यानुसार दिल्ली कॅपिटल्सचा अजिंक्य रहाणे आणि चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणारा रॉबिन उथप्पा पुन्हा एकदा राजस्थानकडून खेळताना दिसतील, अशी चर्चा रंगत आहे.
राजस्थानचे दोन प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी याआधीच दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली. त्यातच, लायम लिव्हिंगस्टोन आणि अँड्र्यू टाय यांनीही बायो बबलमुळे आलेल्या थकव्यामुळे माघार घेतली आणि ते मायदेशीही परतले. चार विदेशी खेळाडूंनी माघार घेतल्याने राजस्थानकडे आता जोस बटलर, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस आणि मुश्तफिझूर रहमान हे चारच विदेशी पर्याय उरले आहेत. त्यामुळेच आता सुरू झालेल्या मिड विंडो ट्रान्सफरमध्ये राजस्थान संघ अन्य संघांकडून खेळाडू लोनवर म्हणजेच उधारीवर घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
कोणत्याही फ्रँचाईजीला तीन खेळाडूंहून अधिक खेळाडू एकाच फ्रँचाईजीला लोनवर देता येणार नाही. राजस्थानने सीएसकेकडे सलामीवीर रॉबिन उथप्पाची मागणी केली आहे. उथप्पा यंदाच्या सत्रात अद्याप एकही सामना खेळलेला नसल्याने तो नियमानुसार ट्रान्सफरसाठी पात्र ठरत आहे. याआधी २०२० च्या सत्रात उथप्पा राजस्थानकडून खेळला होता; परंतु नंतर त्याला रिलिज करण्यात आले होते. अजिंक्य रहाणेही राजस्थान संघाचा सदस्य बनू शकतो. यंदाच्या सत्रात रहाणे दोन सामने खेळला आहे. नियमानुसार दोन किंवा त्याहून कमी सामने खेळलेल्या खेळाडूची बदली होऊ शकते. त्यामुळे त्याच्यासाठी राजस्थान संघ प्रयत्नशील आहे.