Andre Russell, IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) यानं मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या पराभवानंतर अभिनेता आणि संघ मालक शाहरुख खान यांनं केलेल्या ट्विटवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खान यानं केकेआरचा पराभव अतिशय निराशाजन असल्याचं म्हटलं होतं आणि आंद्रे रसेल यानं आम्ही चूकांमधून धडा घेऊन पुढे जाऊ असं म्हटलं आहे. आंद्र रसेलनं दिलेल्या माहितीनुसार मुंबई विरुद्धच्या कालच्या पराभवावर केकेआरचा संघ खूप निराश आहे. सामन्याच्या १५ व्या षटकापर्यंत सामना केकेआरच्या बाजूनंच होता. पण अखेरीस केकेआरला १० धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.
KKRनं चाहत्यांची माफी मागायला हवी, संघमालक शाहरुख खान संतापला; वीरूनंही टोचले कान
केकेआरच्या पराभवानंतर शाहरुखनं ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. "अत्यंत निराशाजनक कामगिरी. केकेआरच्या चाहत्यांची माफी मागायला हवी", असं ट्विट शाहरुखनं केलं होतं. शाहरुखच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना आंद्रे रसेल यानंही शाहरुखच्या विधानाशी सहमत असल्याचं म्हटलं पण त्याचसोबत हे क्रिकेट आहे आणि खेळात केव्हाही काही होऊ शकतं, असंही रसेल म्हणाला.
नेमकं काय म्हणाला रसेल?"मी शाहरुखनच्या ट्विटचं समर्थन करतो. पण शेवटी क्रिकेट हा एक खेळ आहे. जोपर्यंत खेळ संपत नाही तोवर तुम्ही कोणताच अंदाज बांधू शकत नाही. कारण काहीही होऊ शकतं. आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो असं मला वाटतं आणि मला खेळाडूंवर गर्व आहे. या पराभवामुळं आम्ही निराश नक्कीच आहोत. पण जग काही इथंच संपत नाही. आजचा सामना या सत्रातला आमचा दुसराच सामना होता. झालेल्या चूका सुधारुन आम्ही पुढे जाऊ", असं आंद्रे रसेल यानं म्हटलं आहे.
मुंबई इंडियन्सनंकोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी केवळ १५३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या पहिल्या दहा षटकांत २ बाद ८४ धावा झाल्या होत्या. पण सामन्याच्या अखेरीस केकेआरला केवळ १४२ धावाच करता आल्या आणि १० धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.